मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

शुक्रवार, 14 अगस्त 2026

4/1 तरूणाई चे जग -शोधूया नव्या वाटा










































4/5 तरूणाई 2- समाज आणि स्वप्ने

तरूणाई - समज आणि स्वप्ने

कॉलेज विश्वात आपण स्वप्ने पहात असतो. अमुक होणार, हे करणार, या पदावर पोहोचणार, एवढे धन-वैभव मिळवणार !
दहावी ते बारावी या काळात आपल्याला पुढील प्रोफेशनल आयुष्याची दिशा ठरवायची असते. मी इंजिनिअर होणार ,डॉक्टर होणार, वैज्ञानिक होणार, वकील - चार्टर्ड अकौटंट , गायक, चित्रकार, शिक्षक, प्रोफेसर, उद्योजक वगैरे वगैरे ...! अलीकडे सिव्हील सर्व्हीसेसचे आकर्षणही वाढू लागले आहे आणि त्याचाही विचार कॉलेज- विद्यार्थी करू लागले आहेत.
असले कोणतेही प्रोफेशनल क्वालिफिकेशन मिळविण्यामागे उद्दिष्ट असते पैसा मिळविण्याचे. कारण आयुष्यात सुखोपभोग हवे असतील तर पैसा हवाच. पैशाने काय काय मिळू शकेल व ते आपण मिळवायचेच याचा विचार होऊ लागतो. उत्तम पगाराची नोकरी, गाडी, छानसा बंगला, सुट्टी सहलीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची सोय ! बस्स, कॉलेज वयात एवढेच दिसत असते. पण समाज परिस्थिती खूप वेगळी असते. कित्येक मुले मुली लांबचे अंतर कापून कॉलेजात येत असतात. बसने लांबच्या गावातून, कधी सायकलने, थोडंफार मोटर बाईकने आणि क्वचित कारने ! थोडक्यात ते शिक्षणही सुखासुखी होत नसते. अगदी शहराच्या ठिकाणी राहून कॉलेज करणारी मुले असली तरी कित्येकांचे जेवणाचे डबे गावाकडील घरून येत असतात आणि प्रसंगी त्या डब्याअभावी एखादा दिवस उपासही घडतो. अशा विद्यार्थ्यांचे स्वप्न कदाचित लठ्ठ पगार, आलीशान बंगला, गाडी असे नसेल. तरीही आता आहे त्यापेक्षा अधिक आर्थिक सुबत्ता हे स्वप्न सर्वांचेच असणार आणि त्यांत गैर काय? किंवा असे म्हणू या की त्यात गैर काय असूं शकते? मला जे गैर दिसते ते आहेत समाजाकडून परिस्थीतीमुळे त्यांच्यावर घडत असलेले काही संस्कार !
समाजाची कोणकोणती अंगे आज तरूण मनांवर संस्कार करीत आहेत? कोणते ग्रुप्स, कोणत्या संस्था त्यांना घडवीत आहेत? ठळकपणे मोजता येणाऱ्या संस्था म्हणजे शिक्षण व्यवस्था, शासन व्यवस्था व प्रसार माध्यमे. यांच्याकडून होणाऱ्या कोणकोणत्या संस्कारांमध्ये काय गैर आहे त्यांचा थोडासा मागोवा घेऊ या.
शिक्षण क्षेत्राने गेल्या 25 वर्षात मोठे व्यावसायिक रूप धारण केले आहे व या व्यवसायाला राजकीय कंगोरे देखील आहेत. गॉडफादर या गाजलेल्या कांदबरीचा लेखक मारियो पुझो याने काही वर्षानंतर गॉडफादर 2 ही कादबंरी लिहिली. पहिला डॉन म्हातारा होत असल्याने डॉनचे पद आता मुलाकडे आलेले आहे व विरोधक बव्हंशी मारले गेलेले आहेत अशा पार्श्वभूमीवर ही कादंबरी सुरू होते. पहिला
डॉन मुलाला म्हणतो -- मी डॉनगिरी करून खूप पैसा मिळवला. अघोषित सत्ताही उपभोगली. पण तुझ्या काळात तुला माझ्यासारखी, - माझ्या वळणाची डॉनगिरी करून चालणार नाही. आता तुला डॉनगिरीची दिशा बदलावी लागेल. आणि मला स्पष्ट दिसते की, ती दिशा आहे शिक्षण क्षेत्राची. कारण आपला पैसा तिथे गुंतवला जाऊ शकतो. जा ते क्षेत्र बळकाव. त्यातून तुझा राजकीय दबदबा वाढेल. नवी सत्ता मसल पॉवर मध्ये शोधू नकोस. ती शिक्षणसंस्थांच्या माध्यमात शोध.
ही कादंबरी वाचत असताना मला खूपदा प्रश्न पडला की लेखकाला भारतीय शिक्षण व्यवस्थेकडून तर ही कल्पना मिळाली नसेल ना?

शिक्षण संस्थेला व्यावसायिक रूप आले आहे असे म्हणताना व्यवसाय म्हणजे वाईट असे समीकरण कोणीही मांडू नये. खरे तर नैतिकता व सचोटी ठेऊन केलेला व्यवसाय हा समाजाला उत्कर्षाप्रत नेणाराच असतो. पण सचोटी नसेल तेंव्हा तोच व्यवसाय अपकर्षाकडे देखील नेऊ शकतो. तेच शिक्षण व्यवस्थेचे झाले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना भरमसाठ फी, सोबत उकळलेली कॅपिटेशन फी यांच्या बदल्यात विद्यार्थ्याला द्यायचा असतो फक्त एक ठप्पा मारलेला कागद. शिक्षणसंस्थेसाठी सरकारकडून अत्यल्प मोबदल्यात मिळवलेल्या जमीनीच्या मोठया भागावर कमर्शियल डेव्हलपमेंटची परवानगी पण घेतलेली असते व त्यातूनही पैसे मिळतच असतात. नाही म्हणायला कॉलेजची बिल्डींग, फर्निचर, लॅब, लायब्ररी व स्पोर्ट फॅसिलिटी हे उभारावे लागते. तोच काय तो खर्च. शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी नोकरीवर घेतानाच त्यांच्याकडून भरपूर (लाखांच्या घरात) पैसे घेऊन झालेले असतात व त्यांना द्याव्या लागणाऱ्या पगारातील बराच पैसा शासन किंवा युजीसीकडून घ्यायचा असतो. शिक्षक किंवा प्रोफेसर हे लेबल चिकटलेल्या व्यक्तीला ते लेबल म्हणजे एक लायसेन्स असते. कॉलेजबाहेर खाजगी कोचिंग क्लास उघडण्याचे. कित्येकदा हे कोचिंग क्लासही त्याच शिक्षण संस्थेचे असतात. त्यातूनही विद्यार्थ्याकडून फी वसूल करता येते.
हा व्यवसाय असाच करायचा असतो. व त्या पैशाच्या मोबदल्यात विद्यार्थ्याला विद्या देण्याची गरज नाही -- फक्त सर्टिफिकेट द्यायचे असते -- हा संस्कार कळत - नकळत विद्यार्थ्यापर्यंत पोचत असतो. ज्ञान व विद्या महत्वाचे नसून सर्टिफिकेट महत्वाचे आहे हा संस्कार होत असतो. मात्र सुदैवाने इतर समवयस्क मित्रांबरोबर विचार, सुसंवाद, यांची देवाणघेवाण चालू असते. सहली, ट्रॅकिंग, स्पोर्टस्, आर्ट क्लब यांच्यातून चांगले संस्कार घडत असतात. काही आदर्शवादी शिक्षक या व्यवस्थेतही टिकून असतात. व स्वत:ला करावे लागणारे कॉम्प्रमाईजसचे दु:ख बाजूला ठेऊन चांगले शिक्षण, चांगली विद्या देऊन जातात. त्यातून शिक्षणाची, ज्ञानार्जनाची गोडी लागते. चांगले व वाईट, सारासार विवेक या गोष्टी कळू लागतात. हे कळण्यामागे त्या वयातील ऊर्जा व ऊर्मी यांचाही मोठा वाटा असतो. हा विवके मिळाल्यास अभ्यास, प्रयत्न, सातत्य, चिकित्सक बुध्दि, विचारमंथन या प्रक्रियांचे महत्व कळू लागते.
पण हा विवेक आणि ज्ञानार्जनाची गोडी सर्वांनाच मिळेल याची गॅरंटी नसते. आणि मिळाले तरी काही प्रसंगी ते एका दुसऱ्या संस्कारापुढे फिके पडतात. आणि तो संस्कार असतो रॅट रेसमध्ये सतत पुढे-पुढे जाण्याचा. त्यासाठी वेळप्रसंगी इतरांना मागे खेचण्याचा.

पी.टी. उषाच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग. ऑलिम्पिकमध्ये ती छान पळाली होती. पण शेवटच्या लाईनवर येताना ज्याचे डोके प्रथम त्या लाईनच्या बाहेर येईल तो जिंकेल हा नियम तिला माहीत नसल्याने व मागच्या स्पर्धकाने पटकन डोके पुढे काढल्याने उषाचा विजय क्षणाच्या काही शतांशाने हुकला. म्हणजे त्या रेसमध्ये पळणे महत्वाचे होते पण नियम माहित असणे हे त्याहून महत्वाचे होते. शिक्षण क्षेत्र हे ही एक रेस झालेले असल्याने तुम्हाला ज्ञान असणे याला दुय्यम महत्व येऊन ज्ञानाचे प्रदर्शन करू शकणे याला महत्व आहे. विषय समजला नाही तरी उत्तर घोकून लिहिलेले चालेल. तसेच मास्तरांनी उत्तर समजावून देणे चालेल. त्याने तुमची विचारशक्ति वापरण्याची क्षमता कुंठित होत गेली तरी चालेल. असेही संस्कार होत असतात.
ज्ञानाची पहिली पायरी म्हणजे खरेपणा हा संस्कारही क्वचितच घडतो. इतरांचे जर्नल्स उतरवून चालतात. शिक्षकही तिकडे डोळेझाक करतात कारण त्यांनाही वेळ नसतो. पण मग जर्नल्सची पध्दत काढून का नाही टाकत हा प्रश्न विद्यार्थी विचारत नाहीत कारण 'का म्हणून' हा प्रश्न विचारायचा नसतो असाच संस्कार बिंबतो. मग लोकमान्य टिळकांची गोष्ट - 'मी शेंगा खाल्या नाहीत म्हणून मी टरफले टाकल्याची शिक्षा लावून घेणार नाही.' ही फक्त गोष्ट उरते. अन्यथा होणारच आणि त्याविरूध्द बोलायचे नाही हा संस्कार येतो. मग भविष्यात हे विद्यार्थी न्यायाची चाड ठेवतील कशावरून? अमाप पैसे खर्च करून डॉक्टर झालेला विद्यार्थी सेवाव्रताने डॉक्टरी कशी करणार? अमाप पैसे देऊन सिव्हील इंजिनिअर झाल्यावर सरकारी नोकरीत लागलेला असिस्टंट इंजिनिअर काय करणार?
खेळ, कलागुण, छंद यांना तर घरातून पालकांकडूनही सुरूंग लागतो. फक्त अभ्यास इतर गौण असेही संस्कार होऊ लागतात. मग इतर कलागुणांच्या योगे उघडे जाणारे कित्येक इतर करियर ऑप्शनदेखील मागे पडतात.
माझा भाचा कॉलेजच्या पहिल्या दुसऱ्या वर्षात असताना त्याने मला विचारलेला प्रश्न आठवतो. मावशी, सचोटीने लागणाऱ्या व्यक्तींना आपण सचोटीनेच वागावे ही प्रेरणा कुठून मिळते. त्या प्रेरणेचे स्त्रोत कोणते. हा प्रश्न सुचला हा ही एक चांगला संस्कार.
पुढे आपण याचेही उत्तर शोधायचे आहे.
---------------------------------------------------------

शनिवार, 17 जुलाई 2021

वाचन संस्कृती कशी वाढेल - इचलकरंजी आपटे वाचनालयासाठी दिलेला लेख

 वाचन संस्कृती कशी वाढेल.

" मी पुस्तके चाऊन चाऊन वाचतो, ” खूप वर्षांपूर्वी एका नुकत्याच ओळख
झालेल्या व्यक्तिने मला हे वाक्य सांगितले होते. आमची ओळखही त्यांच्या
लेखनप्रतिभेमुळे, विशेषतः लेखनातील सुस्पष्ट विचारांमुळे झाली होती. ते कुणी मोठे लेखक वगैरे नव्हते – आताही नाहीत, पण विचारांची सुस्पष्टता आजही जाणवते. म्हणूनच की काय, एखादे नवे पुस्तक वाचायला घेतले की वरील वाक्य हमखास आठवते.
असाच दुसरा प्रसंग – एक सरपंच, सांगलीच्या नरसिंगपुर गावाचे – लौकिकदृष्ट्या शालेय शिक्षणही पूर्ण न केलेले, पण विकासाची प्रगल्भ दृष्टि असलेले. त्यांच्या घरी चहाला गेलेली असताना हॉलमधील लांबच्या कोपऱ्यात बसून एक तरूण अत्यंत मंद आवाजातील रेडियो ऐकत होता. मी आवाज मोठा करायला सांगितल्यावर सरपंच म्हणाले – चला आपण तिथे जाऊन रेडियो ऐकू. माझ्या चेहऱ्यावरील प्रश्नवाचक चिन्ह पाहून पुढे म्हणाले – रेडियो ऐकायचा असेल तर बारीक आवाज ठेऊन व पूर्ण लक्ष देऊन रेडियो ऐका अशी शिस्त मी घरात लावलेली आहे. रेडियोचा बदाबदा आवाज आपल्या कानांवर कोसळतोय आणि आपण दुसरेच कांही तरी करतोय असे होऊ देऊ नये. पूर्ण लक्ष देऊन ऐकले तर ते दीर्घकाळपर्यंत स्मरणात रहाते.
अगदी अलीकडचा तिसरा प्रसंग – झी टीव्हीवर सारेगमापा आणि सोऩीवर
इंडियन आयडल एकाच वेळी सूरू होते. झी चॅनेलवरील स्पर्धक खूप छान गाण म्हणत होती – पण मनाने त्यातून हळूच डोक वर काढल, " तिकडे सोनी वर कोणते बरे गाणे चालू असेल?"- - हात अभावित पणे रिमोट कण्ट्रोलकडे वळले, तेवढ्यात --- मनाच्याच कुठल्या तरी कप्प्यातून दुसरा आवाज आला – " समोरचे गाणे छान रंगत आहे – त्याचा पूरेपूर आंनद घ्यायला कधी शिकणार? का बरे याचवेळी दुसरीकडील माहिती
तपासण्याचा मोह? तिकडले गाणे याहून चांगले असेलही किंवा नसेलही. पण तपासण्या करत बसण्यापेक्षा समोर जे चांगले आले आहे त्याचाच आनंद घ्यावा."
हे तीन प्रसंग मी कां मांडले आहेत? कारण तीनही मधे विचारपूर्वक ग्रहण करणे हा मुद्दा ठळकपणे दिसून येतो. नेमका हाच संस्कार आपल्या नव्या नव्या पिढ्या विसरत चालल्या आहेत. एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे भटकत जाणे याची एवढी सवय जडत आहे की एकाग्रता, किंवा एकतानता हा गुण आत्मसात करणे जमेनासे झालेले आहे.
ज्ञानग्रहणाचे पूर्वापार चालत आलेले मार्ग होते - एकाग्रश्रवण आणि एकग्रवाचन. या दोन्ही शब्दातील एकाग्र हे विशेषण महत्वाचे आहे. यांच्या जोडीला स्वाध्याय – म्हणजे स्वतःचे चिंतन करून एखादा विषय समजून घेणे हे ही महत्वाचे आहे. म्हणूनच "मी चावून चावून पुस्तक वाचतो" या वाक्याचे महत्व आहे. थोडेसे वाचन केल्यावर पुस्तक मिटून आतापर्यंत आपण काय वाचले, त्यातील काय समजले, त्यांतील किती आपल्या
व्यवहारात उतरवायचे, अशा मुद्यांवर चिंतन करून मगच पुढची पाने वाचावी ही ती पध्दत.
आधुनिक काळात म्हणजे गेल्या साठ – सत्तर वर्षांत ज्ञान मिळवण्यासाठी
रेडियो आणि टीव्ही ही दोन नवी माध्यमे निर्मांण झाली. पुस्तकवाचनापेक्षा कमी बौध्दिक श्रमात ज्ञानार्जन साध्य होऊ लागले. आळस हा मनुष्यस्वभावच आहे – मग तो शारीरिक आळस असो अथवा बौध्दिक आळस असो. याच न्यायाने लोक पुस्तकाकडून रेडियो, टीव्हीकडे व आता त्याही पलीकडे जाऊन सोशल मीडीयाकडे वळत चाललेले आहेत. झटपट लाभ, झटपट ज्ञान, सार कांही झटपट, ही त्या मागची मनोवृति आहे.
म्हणूनच या मनोवृतिचे विश्लेषण व त्यातील धोके जोपर्यंत तरूण पिढीच्या लक्षात आणून दिले जात नाही तोपर्यंत त्यांना वाचन संस्कृतिकडे वळवणे कठीण आहे.
काही वर्षीपूर्वी एका परिचिताने मला त्यांच्या दोन-तीन व्याधींबाबत सांगितले.
मी सुचवले की ही ही योगासने दोन दोन मिनिटे करा, लाभ होईल. ते स्वतः डॉक्टर होते. म्हणाले, छे, तेवढा वेळ कां घालवायचा? त्यापेक्षा औषधाच्या दोन गोळ्या घेतल्या की भागते. या संवादानंतर सुमारे दहा वर्षांनी त्यांनी मला सांगितले -- गोळ्या खाऊन उपयोग होत नव्हता, आता योगासने करतो- व्याधीमुक्त आहे, पण अहो, रोज वीस मिनिटे फुकट जातात.
म्हणजे रोगमुक्तिचा लाभ राहिला बाजूला, हा रोज योगासनांमधे जाणारा
वेळ फुकट जातो आहे असेच त्यांना अजूनही वाटत होते. यातून आपण कांय मिळवतो आहे आणि त्याचे आपल्या जीवनात कांय मूल्य आहे याचा विचार ते अजूनही करत नव्हते.
वाचन संस्कृती देखील सध्या याच टप्प्यातून जात आहे. म्हणून वाचन
संस्कारांची पेरणी देखील टप्याटप्याने करावी लागणार आहे. अगदी लहान बालकांना घरी पालकांनी पुस्तके वाचून दाखवणे, त्यांच्या हातात विविध विषयांची पुस्तके, बालमासिके, वर्तमानपत्र इत्यादि देणे, वाचलेल्या विषयांची चर्चा – असे कित्येक प्रकारचे संस्कार घरात घडू शकतात. पण त्यासाठी आईवडील अगर आजी-आजोबांनी वेळ काढणे अपरिहार्य आहे.
शाळेत नियमितपणे वाचनालय वर्ग असणे, वाचलेल्या गोष्टींचे सारग्रहण, रसग्रहण अथवा पाठ म्हणणे यासारखे उपक्रम शाळांमधे असले पाहिजेत. वीसेक वर्षांपूर्वी श्री नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी "गुजरात वाचतो आहे" या नावाने एक वाचन- मोहिम चालवली होती. तसे अजूनही बराच काळ करावे लागेल.
वाचनालये हे कुठल्याही शहराचे वैभव असते. महाराष्ट्रात एकेकाळी वाचनालयांनी खूप मोठ्या मोठया जनक्रांति घडविल्या आहेत. शंभर वर्षाहूनही अधिक काळ टिकलेली वाचनालये आपण आजही पहातो. मात्र या सांस्कृतिक समृद्धीची दखल शासन किंवा समाज प्रकर्षाने घेत नाही. यातील बव्हंशी वाचनालयांना सध्या एकरकमी मदतीची गरज आहे. इमारत दुरूस्ती, इलेक्ट्रिक वायरिंगचे नवीकरण, रॅक्स, कम्प्युटरायझेशन,
अशा प्रकारची मदत तर हवीच आहे. पण त्याही पेक्षा मोठी गोष्ट म्हणजे इथल्या जुन्या स्टाफकडे पुस्तकांच्याबाबत असलेली प्रचंड माहिती. त्या माहितीच्या अनुषंगाने त्यांना लेखन-प्रवृत्त केले तर येत्या कित्येक पीचडी विद्यार्थ्यांना संदर्भासाठी हे लेखन उपयुक्त ठरेल. पण या सर्व गोष्टी करण्याची सरकारची मनोभूमिका पाहिजे. त्याउलट आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी अगदी सध्याच्या बीजेपी शासनानेदेखील सरकारी वाचनालये देखील मोडीत काढण्याची, तिथे स्टाफ न नेमण्याची किंवा असलेल्या
स्टाफच्या मागण्यांचा विचार न करण्याची भूमिका घेतलेली आहे. नाही म्हणायला शिक्षण संचालकांच्या कार्यकक्षेत वाचनालये हा विषय देऊन ठेवलेला आहे. पण लोकांना कुठे वाचायला वेळ असतो असा विचार स्वीकारून वाचनालयांकडे दुर्लक्ष सुरू आहे.
त्याऐवजी वाचनसंस्कृति वाढेल अशी भूमिका असणारा योग्य अधिकारी आल्यास हे चित्र पालटू शकेल.
मला आश्चर्य वाटते ते हे की चांगल्या वाचनालयांचा लाभ घेऊन व मानाच्या
परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी नोकरीत आलेले वरिष्ठ अधिकारी वाचनालयांच्या आणि वाचनसंस्कृतिच्या अधोगतिकडे अलिप्तपणे कसे पाहू शकतात?
एक मात्र मान्य करावे लागेल. यूरोप अमेरिका सारख्या विकसित देशातही टीव्ही व इंटरनेट आल्यानंतर वाचन संस्कृतिला थोडा फटका बसला होता पण त्यांनी आधुनिकीकरणाच्या व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यावर तोडगा शोधला. सर्व पुस्तकांची यादी, अनुक्रमणिका व पुस्तक परिचय इत्यादी माहिती वाचनालयाच्या वेबसाइटवर असणे, नवी नांव नोंदणी अथवा पुस्तक मागणी ईमेलच्या माध्यमातून सुलभ करणे, आधी कुणी तरी वाचायला घेतलेले पुस्तक परत आल्याची माहिती ईमेलवर पुरवली जाणे, प्रसंगी वाचकांपर्यंत कुरियर डिलिव्हरीने पुस्तक पोचवणे यासारखे उपक्रम सर्व
वाचनालयांनी राबवले. एकमेकांकडील पुस्तकांची माहितीही कित्येक वाचनालये देउ लागली. या सर्वामुळे वेळेचा अपव्यय होत नाही असे लक्षात येऊन वाचक वर्ग पुन्हा वाचनाकडे वळू लागला. आपल्याही वाचनालयांमधे असे आधुनिकीकरण व्हायला हवे.
मला वाटते यासाठी यासाठी सरकारने एकदाच एकरकमी ग्रांट द्यावी. कुठे खर्च करणार ते न विचारता, तसले बंधन न घालता, द्यावी. पंधरा ते पंचवीस वर्षे टिकलेल्या वाचनालयांना पंचवीस लाख, २५ ते ५० वर्षे झालेल्यांना पन्नास लाख व त्यावरील सर्वांना एक कोटी. महाराष्ट्रातील सर्व वाचनालयांना नवी झळाळी येण्यासाठी फक्त शंभर – सव्वाशे कोटी रूपये पुरेसे आहेत. हजारो कोटी रूपयांच्या योजना करणाऱ्या शासनाला हे सहज शक्य आहे.
वाचनालयांनी देखील त्यांच्या सदस्यांसाठी व्याख्यानमाला, ग्रंथ-वाचन, कविता-पाठ यासारखे उपक्रम घेत राहिले पाहिजेत. याबाबत नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानने चालवलेला उपक्रम "ग्रंथ तुमच्या दारी" हा एवढा यशस्वी ठरला आहे की परदेशांत देखील मराठी वाचक याचा लाभ घेत आहेत. तसेच खेडयातील शाळांमधे वाचन संस्कृती वाढावी म्हणून rural relations या संस्थेद्वारे चालणारा ज्ञान –Key हा उपक्रमही विशेष उल्लेखनीय आहे.
शेवटी पुस्तकांचे गांव म्हणून प्रसिद्ध झालेल्या सातारा जिल्ह्यांतील भिलार गांवाचा उल्लेख निश्चितच करावा लागेल. वाचन संस्कृतीचा सर्वत्र ऱ्हास होत असातांना भिलारसारखे पुस्तकांचे गांव असणे व ते पर्यटन विभागाच्या नकाशावर असणे हे खूपच आशादायक आहे. याच न्यायाने दीर्घकाळ टिकलेली वाचनालयेदेखील पर्यटन विभागाने नकाशावर घेतली पाहिजेत. .

शुक्रवार, 24 जुलाई 2020

हिम्मत पुरवली पाहिजे -- अपर्णा वेलणकर गांवकरी १९९६


हिम्मत पुरवली पाहिजे !
-अपर्णा वेलणकर
गांवकरी १९९६
बुद्धिमत्ता आणि कर्तबगारीच्या बळावर हिंमतीने वाटचाल करून उच्चस्थानी पोहोचण्याचा आनंद वेगळाच असतो आणि त्यातून मिळणारी आयुष्याची सार्थकता तर दुर्मिळच ! पण अलीकडे वर जाऊ इच्छिणाऱ्यांसाठी शॉर्टकटस् सुद्धा बरेच उपलब्ध असतात आणि बहुसंख्य मंडळी डोक्याला फारसा ताप करून न घेता, त्याच ‘राजमार्गा’ वरून जाणं पसंत करतात. अशा ‘शॉर्टकट- राजमार्गावर’ काही जणांनी समारंभपूर्वक पीडित, उपेक्षित, मुकाट्यानं सारं सोसणाऱ्या स्त्रियांची नावं घालून ‘फक्त स्त्रियांसाठी’ असे फलकच लावून टाकले आहेत. जणू द्रौपदीची थाळी........
जे मागाल ते देणारी!’ आता ही थाळी खरी की खोटी? असली की नकली? असे वाद चालू झाले आहेत आणि ते बरेच काळ खमंगपणे चालूही राहतील.
स्त्रियांचा उद्धार करु इच्छिणाऱ्या या गदारोळात मान उंचावून वर पाहण्याची थोडी तसदी घेतली तर? तिथे दिसतो क्षणोक्षणी परीक्षा पाहणारा एक खडतर रस्ता आणि त्यावरून कर्तबगारीने पुढे जाणाऱ्या काही स्त्रियांच्या पावलाचे ठसे.... कर्तृत्वाच्या बळावर मिळवलेला मानसन्मान ... गुणवत्ता सिद्ध करून सार्थ केलेला अधिकार आणि पुरुषांच्या बरोबरीनेचं नव्हेच, त्यांच्याहीपेक्षा वरचं स्थान!
राज्य आणि केन्द्रस्थानातल्या वेगवेगण्या अधिकारपदांवर काम करून स्वतःच्या कर्तृत्वाचा अक्षय ठसा उमटविणाऱ्या लीना मेहेंदळे... याच खडतर रस्त्यावरून अत्युच्च स्थानी पोहोचलेल्या! आज नाशिक विभागाच्या महसूल आयुक्त म्हणून त्यांच्या हाती चार जिल्ह्यांच्या कारभाराची सूत्रे आहेत.
लीनाताईंना भेटायला गेले तेव्हा मनात अनेक प्रश्न होते... आजवरच्या त्यांच्या प्रवासामधल्या खडतर वाटा – वळणं जाणून घेण्याची उत्सुकताही होती!
पण सुरुवात केली ती त्यांनीच... ! म्हणाल्या, “काय चाललंय सध्या नवीन?”
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या ‘भूकंपग्रस्त ग्रामपुनर्रचना प्रकल्पा’च्या निमित्ताने मी नुकतीच मराठवाड्यातल्या भूकंपग्रस्त गावात फिरून आले होते. बरंच पाहिलं होतं... आपत्ती पुनर्वसनही! उद्ध्वस्त घरांच्या ढिगाऱ्यापुढे बसलेली माणसे.... मदतीची वाट बघणारी, अजून कोणीतरी येईल.... काही तरी देईल म्हणून देणाऱ्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली! हातपाय शाबूत असलेली पण मनाने पांगळी झालेली असंख्य माणसं आणि त्यांच्या पुनर्वसनाचा ‘सरकारी’ खाक्या.... !
लीनाताई उत्सुकतेनं सारं ऐकून घेत होत्या. बारीकसारीक तपशील विचारीत होत्या. बोलता बोलता म्हणाल्या,
खरं म्हणजे पुनर्वसनाच्या कामात शासकीय पातळीवरून सहभागी होण्याची माझी फार इच्छा होती. मी तसे प्रयत्नही केले होते.” – हे ऐकून थक्क व्हायचीच पाळी आली! शासनाने भूकंपग्रस्त भागात पाठविलेले ऑफिसर्स ऑन स्पेशल ड्युटी मी पाहिले होते. त्यांच्याबद्दल बरंच काही ऐकलं होतं....
लीनाताईंना शिवधनुष्य उचलायचं होतं, मग माशी कुठे शिंकली? तर त्यावेळी लीनाताई केन्द्र शासनाच्या सेवेत होत्या. मी विचारलं, तुम्ही थोडा वेगळा विचार केला असता.
होय, बाहेरून येणाऱ्या मदतीवर जगायची सवय लावणं म्हणजे पुनर्वसन नव्हे. माणसांना मदतीपेक्षा हिंमत द्यावी लागते. “भूकंपात घर पडलं ना, ठीक आहे! तुला लागेल ती मदत मी करीन पण तुझं घर तू बांधायचं,” असा ‘व्ह्यू’ घेतला असता तर या दिशेने प्रयत्न तरी नक्कीच केले असते. ”
पण काही लोक म्हणतात, भूकंपग्रस्तांना हे सांगून आम्ही थकलो. त्यांनी आमचं ऐकलच नाही. ”
माणसं ऐकत नाहीतच, त्यांनी पटवून द्यावं लागतं. सिद्ध करून दाखवाव लागतं. ‘अमूक करू नका’ असं तुम्ही सांगता तेव्हा ‘मग काय करू ?’ या पुढच्या प्रश्नांच उत्तर तुम्हाला द्यावचं लागतं. ”
तुम्हालाही असा प्रश्न अनेकांनी केला असेल?”
हो, सांगली जिल्ह्यातल्या देवदासींनी एकदा मला विचारलं होतं, “मॅडम, आम्ही जोगवा मागायचा नाही तर काय करायचं?”
कधीची गोष्ट आहे?”
मी तेव्हा सांगलीची जिल्हाधिकारी होते. जतजवळच्या एका खेड्यांत दर वर्षातल्या पौष पोर्णिमेला मुलींचा ‘झुलवा’ लावण्याची पद्धत होती. अगदी चार-पाच वर्षाच्या मुली देवाला सोडत. मी चार्ज घेतला आणि लगेचच तो दिवस आला. मी सहकाऱ्यांशी बोलले, माहिती घेतली आणि यावर्षी ही प्रथा चालू द्यायची नाही, असा निर्धार करून सगळ्या तयारीनिशी सांगली सोडली. त्या खेड्यात आदल्या रात्रीच मुक्कामाला गेले. ‘मुलीचं जबरदस्तीनं देवाशी लग्न लावून तिला देवदासी करणे हा कायद्यानं गुन्हा आहे. जे कुणी असा प्रयत्न करील त्याला ताबडतोब अटक होईल’, असं जाहीर केल्यावर त्या गावात चांगलीच खळबळ माजली. आसपासचे दहा-बारा सरपंच व काही प्रतिष्ठित मंडळी ताबडतोब भेटायला आली.
या ‘प्रतिष्ठित’ मंडळींशी चांगलीच खडाजंगी झाली. पण लीनाताईंपुढे त्यांचा टिकाव लागू शकला नाही. लीनाताईंनीच सुरुवात केली.
हे पहा आता काळ बदलला आहे. असल्या वाईट प्रथा तुम्ही स्वतःहून बंद पाडल्या पाहिजेत.”
मॅडम आम्हीही तेच म्हणतो, पण मग देवाची सेवा कोण करणार?” गावकऱ्यांनी सवाल टाकला.
देवाची एवढीच काळजी वाटते ना, मग तुम्हीच त्याची सेवा करा. तरुण मुलींनीच माझी सेवा केली पाहिजे, असं काही देव म्हणत नाही... ”
पण मॅडम, देऊळ झाडायचं-पुसायचं म्हणजे बायकांच कामं” एकजण हळूच म्हणाला.
अस कोणत्या देवानं सांगितलं? उद्या तुम्ही देऊळ झाडायला जाऊन पहा. देव तुमच्या हातातून झाडू काढून घेणार नाही. त्यातूनही बायकांनीच देऊळ झाडावं असं वाटत असेल तर पगार देऊन त्या कामासाठी बायका ठेवा. देवाशी लग्न लावण्याची काय गरज आहे?”
सगळीकडे शांतता पसरली. कोणी काहीच बोलेना. तो प्रसंग आठवत लीनाताई सांगतात “देवाचं काय होईल हा मुद्दा त्यांच्या दृष्टीने गौणच होता. ‘हक्काच्या मुली मिळाल्या नाहीत तर आपलं कसं होईल हीच चिंता.’ शेवटी मी सर्वांना निर्वाणीच सांगून टाकलं, “देवाची सेवा तरुण मुलींनीच केली पाहिजे, असं कोणत्या शास्त्रात लिहिलं आहे, ते मला आणूण दाखवा, नाहीतर या प्रथेमध्ये तुमचा स्वार्थ दडलेला आहे, असा अर्थ काढून मी तुम्हाला अटक करुन तुमच्यावर खटले दाखल करीन. “वर्षानुवर्ष चाललं आहे. मग या वर्षीच का नको?” असली भाषा मला चालणार नाही.”
हे सारं त्या मुलीपर्यंत पोहोचलचं असेल?”
खरा धक्का मला त्या मुलींनीच दिला. त्या दिवशी सकाळी यल्लम्मा देवीच्या देवळातच मी मिटिंग बोलावली होती. वर्षानुवर्षे ज्यांनी ‘देवाची’ आणि गावाची सेवा केली त्या म्हाताऱ्या देवदासी, ज्यांची देवाशी लग्न लागणार होती त्या तरूण मुली, पुजारी, गावकरी सगळ्यांना बोलावलं. प्रत्येक जण मला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट बजावीत होता “बाई या भानगडीत पडू नका. देवीचा कोप होईल.”
सगळ्यांशी बोलल्यावर एक गोष्ट लक्षात आली की, मुलीचं देवाशी लग्न लागण्यावरच त्या प्रत्येकाचं आयुष्य अवलंबून होतं.
पुजाऱ्याचा हेतू तर उघडच असणार, पण या प्रथेचे चटके ज्यांनी आयुष्यभर सोसले त्या म्हताऱ्या देवदासी तरी तुच्या बाजूने असतील ना ?”
पहिला विरोध तर त्यांचाच होता. पुजाऱ्यांपेक्षाही वरचा सूर लावून त्या भांडत होत्या. तरूण देवदासींच्या लग्नात या बायकांचाच मोठा पुढाकार असतो. नातीगोती संपवून देवाशी लग्न लावलेलं. तारूण्य ओसरल्यावर त्यांच्या हातातोंडाची गाठ कशी पडणार ? नव्या मुली येतात, तेव्हा या जुन्या बायकांच्या म्हातारपणाची आयतीच सोय होते, त्यामुळे नव्य़ा मुलींना ‘सगळे धडे’ देण्याचं काम त्या आनंदाने करतात.
मुलीच्या आईबापांना ‘देवीच्या कोपाची’ भीती असते. ‘खाणारं एक तोंड कमी झालं’ याचा आनंदही नाही म्हटलं तरी असतोच.”
आणि त्या मुली?”
त्यांचं वय अडनिडं असतं की, नेमकं काय चाललं आहे हेच त्यांना समजत नाही. दोन वेळच्या अन्नाला महाग त्या मुलींना जोगवा मागणही आवडतं. पुढे गावातल्या प्रतिष्ठितांशी ‘सबंध’ जुळतात. लग्न करता येत नसल तरी शारीरिक सुख मात्र मिळतं. तरूण वयात हे सारं हवसं वाटतं. पुढे पुढे चटके बसतात, पण तेव्हा त्यांना काहीच करता येत नाही.”
म्हणजे त्याही तुमच्या बाजूने नव्हत्या?”
सुरुवातीला कोणीच नव्हतं. मुली म्हणाल्या, “आमी लगीन लावलं न्हाई, तर आई कोपल.”
मी विचारलं, “तुम्ही देवीला आई म्हणता मग तुमचं वाईट व्हावं असं तुमच्या आईला वाटेल का? आणि समजा आई कोपली तरी ती तुमचं वाईट करील का?”
हे थोड पटतं आहे असं दिसलं. कोणीतरी विचारलं,
बाई, तुमी देव मानता का?”
मी म्हटलं, “ मी आताच मंदिरात जाऊन यल्लम्माआईची पूजा करून आले ना. पण जो लोकांना कोपण्याच्या धमक्या देतो तो देव कसा असू शकेल? मुलीने तिला आवडलेल्या तरूणाशी लग्न करू नये, असं सांगतो तो तरी कसला देव? ते भूतचं म्हटले पाहिजे. अशा देवाला तुम्ही डोक्यावर घेऊन नाचता, ... खरा देव हिम्मत देणारा असतो.”
सगळीकडे शांतता पसरली. थोड्या वेळाने कोपऱ्यातून मुद्याचा प्रश्न आला,
पण मग बाई, आमी पोट कसं भराव?”
मी आनंदाने म्हटलं,
ती जबाबदारी माझी, शरीर न विकता पोट कसं भरायचं हे मी तुम्हाला शिकवीन. पण तुम्हाला काम करावं लागेल. घरी बसून आम्हाला मदत करा म्हणाल तर तुम्हाला एक पैसाही मिळणार नाही.” मीटींग संपली. या सगळ्या सवाल-जबाबामधून एक नवी दिशा मिळाली.
आमी पोट कसं भरावं?” या प्रश्नाचं उत्तर त्या मुलींना हवं होते. ते मिळाल्याखेरीज नुसता कायद्याचा बडगा उगारून काहीच करता आलं नसतं.
लीनाताईंनी काय केलं असेल?
त्या मुलींना मी लगेच सांगितलं. “जतला जाऊन या, तिथं कुक्कुटपालन केन्द्र आहे, ते बघा. मी तुम्हाला ट्रेनिंग द्यायची व्यवस्था करते. ज्यांची तयारी असेल त्यांनी लगेच नावं नोंदवा.” मुली तयार झाल्या. ज्यांना शिवणकाम शिकायचं होत, त्यांच्यासाठी दुसरी बॅच सुरु केली. गडहिंग्लजमध्ये रेशमाचा धागा करण्याचा उद्योग सुरु करता येण्यासारखा होता. काही मुलींना तिकडे पाठवलं. शिकायला येणाऱ्या मुलींना स्टायपेंड देण्याची व्यवस्था केली. चार महिन्यामधेच २५० मुलींच कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण पूर्णही झालं.”
पुन्हा त्या मुली काम मागायला आल्या असतील?”
या मुली एकदा शिकल्या की, त्यांना काय काम पुरविता येईल, याचा विचार मी आधी पासून करत होते. आय.आर.डी.पी. योजनेमधून लोन मिळवून त्यातून कोंबड्या घेता येतील, पोल्ट्री उभी राहू शकेल. मुली स्वेटर्स बनवू शकतील. या सगळ्या गोष्टींसाठी मार्केटिंग सिस्टीम घालून देता येईल’- अशा अनेक योजना मनाशी होत्या........
आणि अचानक लीनाताईंची बदली झाली. कायद्याने दोषी ठरलेल्या काही शासकीय व्यक्तींना शिक्षा झाली पाहिजे असा आग्रह लीनाताईंनी धरला होता, त्यासाठी मुद्दे-पुरावेही दिले होते.
दोषी व्यक्तींना शिक्षा झाली नाही, पण लीनाताईंची बदली मात्र लगेचच झाली. सांगलीच्या जिल्हाधिकारी म्हणून अत्यंत यशस्वी कारर्कीर्द केलेल्या लीनाताईंना पश्चिम महाराष्ट्र विकास महामंडळाच्या (WMDCच्या) कार्यकारी संचालकपदी पाठविण्यात आलं होतं. एका अर्थी सूडबुद्धीतून देण्यात आलेली ती साइड पोस्टिंग होती.
तुमची काय प्रतिक्रिया होती या निर्णयाबद्दल?”
फार निराश झाले होते. पण असे प्रसंग येणार, याची थोडीफार मानसिक तयारी ठेवावीच लागते. सांगलीचा चार्ज देऊन पुण्याला आले तेव्हा नव्याने सुरु केलेल्या या कामाचं काय होणार याची चिंता होती. पुण्यामध्ये आल्यावर विद्यार्थी सहाय्यक समितीच्या श्री. अच्युतराव आपटे यांना भेटले, त्यांना सगळं सांगतिलं, म्हटलं. “मी आता काही करू शकत नाही, पण हे काम थांबता कामा नये. तुम्ही त्यात लक्ष घाला. वेगवेगळ्या संस्थांच्या मदतीने त्या मुलींना कामाला लावा.”
बोलता बोलता अच्युतराव लीनाताईंना म्हणाले, “दुसरी संस्था शोधता? WMDC मार्फत हे काम होऊ शकणार नाही का?” हा एक वेगळाच विचार त्यांनी दिला होता. वर्तमानात असलेल्या शासकीय पदातून आपण लोककल्याणाचे काम कसे करायचे ती वाट शोधली पाहिजे हा तो धडा होता. (बोलता बोलता लीनाताईंनी सांगितले की त्यांचे वडील व अच्युतराव कॉलेजात एकत्र शिकत होते.)
पुन्हा नव्या उत्साहाने प्रयत्न सुरु झाले. लीनाताईंनी WMDC मध्ये या कामाबद्दल सांगतिलं. आनंदाची गोष्ट म्हणजे WMDC मधील अध्यक्ष व कार्यकारी मंडळ या कामाला पाठिंबा देत होते. शासनाकडे योजना तयार करून पाठविली. शासन म्हणालं, देवदासींच कल्याण करण्याची जबाबदारी समाजकल्याण करण्याची जबाबदारी समाजकल्याण खात्याची आहे, WMDC ने त्यात लक्ष घालू नये.
ग्रामीण उद्योगधंद्यांचा विकास’ WMDC च्या अखत्यारीत येतो. मग या नावाखाली पुन्हा नवी योजना आखली. शासनाचे उत्तर आले, ते “R.D.D चं काम आहे, तुमचं नाही.”
शासनाने मंजुरी नाकारली, पण लीनाताईंनी आपल्या अधिकारात जेवढी मदत पुरविता येईल तेवढी पुरवायची असं ठरवलं. त्याप्रमाणे काम सुरु झालं. लीनाताईंनी आपल्या चेअरमनना आणि मव्या सहकाऱ्यांना या कामाचं महत्व आणि वेगळेपण पटवून दिलं होतंच. प्रत्येकाने कामात सहभागी व्हायची तयारी दाखविली.
गडहिंग्लजमध्ये एक देवदासी आर्थिक पुनर्वसन केन्द्र उघडून तिथे या मुलींना हळूहळू कामाला लावायचं ठरवलं. त्यांना सांगितल, लोकर खरेदी करणं, स्वेटर्स विकणं हेही आता तुमचे काम आहे. तुम्ही पुढे शिका. मुलींनी पुन्हा एक धक्का दिला. त्या म्हणाल्या, ‘ही कटकट आम्ही करणार नाही. आम्ही फक्त स्वेटर विणून तयार करू. त्यांचे पैसे मिळवून द्या.”
पुढे तर अगदी ‘संप करु’ इथंपर्यंत मजल गेली. एखादा असता तर हात झटकून मोकळा झाला असता. लीनाताईंनी काय केलं? त्या सांगतात....
थोडा विचार केल्यावर लक्षात आलं की, त्यांच्या मनाची तयारी असून झालेली नाही. केल्या कामाचे पैसे मागणं, नाही मिळाले तर संपाची भाषा करणं वेगळं आणि स्वतःच्या आयुष्याचा आर्थिक पाया घालणं वेगळं. त्या मुलींनी कुणाच्याही मदतीशिवाय स्वतःच्या हिंमतीवर उभं रहावं, अशी माझी इच्छा होती. पण ते त्यांच्या मनाला पटणंही गरजेचं होतं. ही जाणीव व्यक्तिमत्व विकासातून येते. म्हणून या मुलींसाठी ‘व्यक्तिमत्व विकास शिबिर’ घ्यावं असं ठरवलं, त्यासाठी शासनाकडे पैसे मागितले.”
मिळाले का?”
शासनाने मला कळवलं, ‘असल्या प्रकारांसाठी शासनाकडं पैसा नाही’. मी म्हटलं नसू दे! WMDC तर्फे खर्च करायचा असं ठरवलं. कोल्हापूरहून प्राचार्या लीलाताई पाटील यांची मदत घेतली. पुण्याहून निर्मलाताई पुरंदरे आल्या. पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडून अवचित मदत मिळाली. विद्यापीठाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि शिक्षक सहभागी झाले. गडहिंग्लज ला ५-७ शिबिरं झाली. विद्यार्थ्यांनी तर राखी पोर्णिमेला या मुलींकडून राखी बांधून घेतली. लीलाताई, निर्मलाताईंशी मुली मोकळ्यापणाने बोलल्या आणि सगळ वातावरण बदलून गेलं. इतक की पुढे लगेचच केंद्र शासनाच्या महिला बाल कल्याण विभागाने या प्रकल्पासाठी भरीव मदत केली.
तुम्ही इतरत्र गेल्यानंतर त्या मुलींचा तुमच्याशी पूर्वीइतका संपर्क राहिला नसेल?”
माझ्यापेक्षाही शहराशी त्याचा संपर्क येण्याची गरज होती म्हणून आम्ही त्यांना ग्रुप ग्रुपने पुण्यात, मुंबईला आणि दिल्लीत नेले. त्या स्वतंत्रपणे पुण्यात फिरू लागल्या, मग त्यांना पुण्यातली लोकरीची दुकानं दाखविली. मोल-भाव कसा करायचा, डीलरकडून माहिती कशी मागवायची, पैशाचे व्यवहार कसे करायचे ते शिकवलं. पैसे मिळवायचे तर लिहिता-वाचता येण किती महत्वाचं आहे हे आपोआपच त्यांच्या लक्षात आलं. त्या मुली लांबच्या गावांतून गडहिंग्लजला येत. लीनाताईंनी त्यांना सुचवलं “तुम्ही सायकल का शिकत नाही?” सात-आठ जणी हौसेने सायकल शिकल्या. कर्जाचे हप्ते ठरवून सायकल खरेदी करायलाही लीनाताईंनी मदत केली.
मुलींना सायकली मिळाल्या आणि त्याहीपेक्षा मोठा आत्मविश्वासही! पुढच्या मिटींगमध्ये मुली म्हणाल्या “तुम्ही आम्हाला जीप पण घेऊन दिली तर आम्ही जीप शिकू.”
एव्हाना या कामाला स्वतःची गती मिळाली होती. सुरुवातीच्या काळात गडहिंग्लच्य़ा शाळेने दिलेल्या एका जागेत मुली काम करत. लीनाताईंनी आर.सी.एफ. शी संपर्क साधला. इमारत बांधण्यासाठी ग्रँट मागितली. कोल्हापूरच्या जिल्ह्याधिकाऱ्यांकडून इमारतीसाठी जमीन देण्याचं आश्वासनं घेतलं.
लीनाताई सांगतात, “काम त्यांचं त्यांनीच करावं असा माझा हट्टच होता. मी फक्त मुलींना सांगतिलं, जमीन हवी ना इमारतीसाठी? तुम्ही स्वतः अर्ज करा. मी फक्त फॉलोअप करीन.”
दिल्लीत IITF तर्फे दरवर्षी औद्योगिक प्रदर्शन भरतं. त्यात WMDC चा एक स्टॉल असतो. गडहिंग्लजहून मुलींना बोलावलं. एवढ्या मोठ्या प्रदर्शनात त्यांनी स्वतः स्वेटर्स विकले. सुरुवातीला रंगांची माहितीही नसणाऱ्या मुली, आता शेडस् बद्दल, कॉम्बीनेशन आणि डिझाईनबद्दलही मोकळेपणाने बोलू लागल्या. गिऱ्हाईकाला कुणाला काय चांगलं दिसेल ते सांगू लागल्या. आम्हाला हिंदी शिकवा असा आग्रह धरू लागल्या. थोडक्यात काय तर पुनर्वसन ही काय एका रात्रीत घडू शकणारी बाब नाही. भूकंप आला, तर एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त होतं. देवाशी लग्न लावलं तर एका क्षणांत जीवनाची दिशा पालटते. पण स्वतःच्या पायावर उभ रहा म्हटलं तर चिकाटीने बराच काळ प्रयत्न सुरु ठेवावे लागतात. त्यांनी विचारांची जोड द्यावी लागते. एका तऱ्हेने प्रश्न सुटत नसेल तर वेगळ्या तऱ्हेने सोडवावा लागतो. सातत्य लागत. मुळांत धीर खचलेल्यांना हिम्मत पुरवावी लागते. तरच पुनर्वसन होऊ शकत. सरकारी मदत म्हणजे हिम्मत नाही, ती संवादातून व चिकाटीतून येते. ती पुरवायची म्हटली तर हे काम सरकारी नसून आपण आपल्याच लोकांसाठी करत आहोत ही भावना सातत्याने ठेवावी लागते.
----------------------xxx----------------------

मंगलवार, 15 नवंबर 2016

वादळाचा पाठलाग- दै लोकमत 13/12/99

13/12/99
वादळाचा पाठलाग

बातमी:-
ओरिसा राज्यात भयानक चक्रीवादळ. पारादीप बंदर संपूर्णपणे नष्ट. सुमारे बारा जिव्हे वादळग्रस्त. मालमत्तेचे प्रचंड नुकसान. मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखील. बहुधा या शतकातले हे सर्वात मोठे वादळ.

प्रतिक्रिया (महाराष्ट्र):-
पुनः एकदा लातूर भूकंपांची आठवण व्हावी अस भयानक वादळ आल आहे ओरिसात. हो, पण दोन प्रकारांनी ही घटना वेगळी आहे. लातूर भूकंपाचे भौगोलिक क्षेत्र अगदी मर्यादित होते- वीस पंचवीस गांव एवढेच. इथे सुमारे बारा जिल्हे क्षतिग्रस्त झालेत. ही वाव परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टिने जास्त गैरसोयीची आहे. जागोजागी मोठमोठी झाड उन्मळून पडल्याने रस्ता अडले आहेत. त्यामुळे मदत पोचवण्यांत मोठी अडचण आहे. त्यातल्या त्या एक वर आहे- प्रत्येक गांवात जीवितहानी हा प्रकार झालेला नाही. कांही ठराविक गांवातच तसे झाले आहे.

या चक्रीवादळाने झालेले नुकसान
वेगवेगळ्या प्रकाराने झाले. कांही ठिकाणी दुर्दम्य वेगाचे वारे आले. सुमारे ताशी अडीचशे ते तीनशे किलोमीटर हा वेग! डेक्कन क्वीन पिंपरी ते तळेगांव या पह्यांत सर्वाधिक म्हणजे ताशी शंभर कि.मी. हा वेग सुमारे पंधरा मिनिटांसाठी गाठते. त्यावेळी दारांत उभे राहून या वेगाचा अनुभव घेता येईल. पण ओरिसातील वादळाचा वेग ताशी अडीचशे किलोमीटर आणि सतत ------ तास टिकून राहिला होता. असो.
या झंझावाताने झाडे उन्मळून पडली. अगदी दहा-बारा मीटर घेराची झाडे देखील समुद्र पह्यांत एरवी दृष्टि पोचेल तिथपर्यंत उंच उंच नारळ, पोफळी, आणि ताडाची झाड दिसतात ती एकतर भुईसपार झाली किंवा निम्म्यांत मोडली किंवा त्यांची पान फाटून चोळामोळा, विदूप होऊन गेली. जिथे ही झाड रस्त्यांवर पडली तिथे रस्ते बंद झाले. घरांवर पडली तिथे छप्परं तुटून गेली. शेतात, ओठ्यांवर आणि कालव्यांवर या किना-यापासून त्या किना-यापर्यंत, अशी कुठे कुठे पडली. समुद्रात वाहून गेली.
ओरिसात कांही मुख्य शहरांतल्या मुख्य इमारती सोडल्या तर बहुतेक घरं मातीची. वर भाताच्या पेंढ्या टाकून शाकारलेली. पेंढ्यांखाली आधाराला
बांबू. त्या पेंढ्या उडाल्या, बांबू तुटू गेले!
तडाख्याच्या वा-याबरोबर पाऊस सुरू झाला आणि त्याने तीन-चार दिवस थैमान घातले. ज्या मातीच्या घरांची छपर उडून-तुटून गेली होती त्यात पाऊस पडायला सुरुवात झाली. घरांत साठवलेल धान्य, कपडे, वह्या-पुस्तक सगळ त्या पाण्यांत भिजून नष्ट झाल. मातीच्या भिंतीवर पावसाचे तडाखे बसले आणि भिंती विरघळून जाऊ लागल्या- खचू लागल्या. कुठे पन्नास तर कुठे शंभर वर्षांपासून च्या भिंती आणि घरं ढेपाळत असतांना ते उघड्या डोळ्यांनी फक्त बघणे यापेक्षा हातात कांही उरले नव्हते.
किंवा ते बघायचे समाधान ते तरी होते कां? गांवात पक्की घर एखादे-दुसरीच. कुठे ती देखील नाहीत, पण मंदिर, मशीद, चर्च वगैरे इमारती पक्क्या. लोकांनी अशा घरांत आश्रम घेतला होता. वातावरण निवळल्यावर घरी परतले तेंव्हा फक्त खचलेली घरं उरली होती.
प्रत्येक गांवात मंदिर-मशीदींसारख्या धार्मिक इमारतींच्या जोडीला कांही सरकारी पक्क्या इमारती पण असतात. उदाहरणार्थ शाळा! तिथे लोकांना आश्रय घेता आला कां?
नाही-कारण सगळ्या शाळांवरची छप्पर आणि भिंती कमी-अधिक मोडून पडलेल्या होत्या. सरकारी इमारती अशा. तर सरकारीमाणसांची अवस्था याहून वाईट. वादळग्रस्त भागांत मदत म्हणून जे सामान पोचल- धान्य, ब्लँकेट्स, कपडे त्यांच योग्य वितरण होऊ शकेल अशी सरकारी यंत्रणाच नव्हती. त्याचे वेगवेगळे नमुने आणि वेगवेगळे किस्से ऐकायला मिळाले.
महाराष्ट्राशी तुलना करायची म्हटली तर इथल्या बहुधा प्रत्येक गांवात तलाठी, ग्रामसेवक, विविध कार्यकारी सोसायटीचा सेक्रेटरी, .एन्.एम्, आंगणवाडी वर्ळर असे सरकारी यंत्रणेपैकी कोणी ना कोणी तरी उपलब्ध असते. नैसर्गिक आपत्ति नंतर त्यांनी तत्काळ प्रत्येक घरांतील जीवित वा मृत. व्यक्तिंचा तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा किंवा रिपोर्ट तयार करावा असे प्रशिक्षण मिळालेले असते. तहसिलदार, बीडीओ, तसेच प्रांत अधिकारी, कलेक्टर, सीईओ इत्यादि अधिकारी तत्काळ जागेवर जाऊन पोचतील अशी यंत्रणा असते. एखाद वेळी ही कोलमडते देखील. पण ओरिसात ही यंत्रणा अस्तित्वातच नव्हती. गांव पातळीवर जिथे जे सरकारी व्यक्ति होते ते निघून तरी गेलेले किंवा स्वतःचे घर सावरण्यांत गुंतलेले. तालुका व
वरिष्ठ अधिकारी राजकीय वरदहस्तामुळे पोस्टिंग मिळालेले म्हणून त्यांनाही मुख्यालयांत रहाणे बंधनकारक नाही. मुख्यमंत्री मुलाच्या आजारपणासाठी आणि सोनियाजींकडे आपली पत टिकवण्यासाठी आणि सोनियाजींकडे आपली पत टिकवण्यासाठी वारंवार दिल्लीत तर मुख्य सचिव चक्क अमेरिकेत! इकडे कांय होईल असा प्रश्नाविचारल्यावर आमचे इतर अधिकारी सक्षम आहेत ते बघून घेतील हे उत्तर!
पारादीप मधे एका आय्..एस् अधिका-याच्या कर्तव्यदक्षतेचे खूप किस्से ऐकायला मिळाले. कांही खरे, कांही खोटे. कारण तो स्वतः याबाबत कांही बोलू शकत नाही. पण किस्सा असा कि हा अधिकारी दुसरीकडे कुठल्याशी पदावर होता. वादळाची बातमी ऐकून मिळेल त्या वाहनाने- म्हणजे कार, ट्रक, मोटर सायकल, होडी, सायकल इत्यादि करत तो पारादीपला पोचला. स्वतः एअरफोर्सचा अधिकारी असल्याच सांगत. मग बीडीओच्या ऑफिसमधे जाऊन बसला- कारण सर्व मदतवाटप तिथून होत होतं. पाहतो तो सामान जाऊन बसलेल बडीओ, राजकीय नेते व इतर लहान मोठ्या अधिका-यांच्या घरात. लोकांना तीन-तीन दिवस उपास घडत होता पण यांची घरं भरत होती. मग त्याने आर्मीला
सांगितले की माझी सरकारने येथे स्पेशल नियुक्ति केली आहे, माझा हुकुम ऐका आणि दोन तासाची मुदत देऊन सगळ सामान पुनः ऑफिसमधे जमा करवू घेतल. रेड टाकण्याची धमकी देऊन. मग स्वतः सर्व सामान वाटप व्यवस्थित करवून घेतल. सरकारने एक बर केल- त्याची तिथे स्पेशल ऑफिसर म्हणून ऑर्डर काढली. या कहाणीतील अतिरंजन किती , खर किती, हा प्रश्न सोडून देऊ कारण त्याला अजून त्याच सरकारमधे खूप वर्ष काढायची आहेत. मात्र सरकारी मदत म्हणून आलेली ब्लँकेट्स, पॉलीथीन इत्यादि थेट कलकच्यापर्यंत बाजारात विक्रीला पोचली होती हे ही तेवढच खरं!
भुवनेश्वर हे राजधानीच ठिकाण. बहुतेक सर्व घरं पक्की. त्यांच नुकसान कांही नाही. मात्र झाडं उन्मळून पडल्याने जागोजागी रस्त अडले होते. विजेच्या व फोनच्या तारा तुटल्या होत्या. नुकसा एवढेच. पण मंत्रालयात अधिकारी व कर्मचारी न येणे किंवा उशीरा येणे सुरु झाले. कारण कांय? तर या भयानक वादळामुळे जे नुकसान इतरत्र झाले असेल, त्याची कल्पना करून करून माझे हात-पाय गळाले! अस म्हणतात की निदान सेक्रेटरी पदाच्या अधिका-यांनी तरी दहा वाजता ऑफिसात हजर राहिलच पाहिजे असे सरकारला आदेश काढावे लागते!
वादळात तोंड द्यायचं आहे या इच्छा शक्तीचा सर्वत्र अभाव दिसून आला.
दिल्लीहून पहाणीसाठी गेलेल्या अधिका-याने एक किस्सा सांगितला- भुवनेश्वर कटक कलकत्ता हायवेवर त्यांची गाडी थांबली- पुढे ट्रँफिक जाम! उतरून पाहिल तर एक भल मोठ झाड रस्त्यावर आडव पडलेलं. कांही मुलं अजून जमीनीत रुतलेली पण बुंधा हलवता येऊ शकत होता. याने स्वतःचे दोन अधिकारी बोलावले व इतर अडलेल्या प्रवाशांना मदत करायला सांगितली तेंव्हा कुणी पाठ दुखते, हात दुखतात अस सांगत बाजूला झाले. शेवटी आर्मीच्या जीपमधला एक कॅप्टन व चार पाच सैनिक आले. सर्वांनी मिळून झाड हलबल. या प्रकारे सुमारे तेहतीस किलोमीटर रस्ता यांनी दहा-बारा झाड हलवून मोकळा केला पण मदतीला इतर कुणी पुढे आल नाही. इच्छा शक्ती नसण्याच हे ही एक उदाहरण.
वादळानंतर सुमारे महिन्याभराने मी तिकडे गेले असतांना चित्र जवळजवळ तेच होत. शाळा दुरुस्त करावी, निदान विद्यार्थ्यांना घेऊन स्वच्छ करावी- बाहेर उघड्यावर बसून कां होईना - पण वर्ग चालू ठेवावेत- वह्या पुस्तकं नसतील पण तोंडी शिक्षण सुरू ठेवावं- अस कांहीही कुठेही सुरू नव्हत. लोकांना रोजगार पुरवावा, असही चित्र नव्हत. जवळ जवळ दहा
जिल्ह्यांमधे शेती नष्ट झाली. त्यासाठी योजना किंवा आढावा नव्हता. किमान पाच ब्लॉक्स मधे जीवितहानी झाली. मुल, माणस अनाथ झाली- त्यांच्यासाठी योजना नव्हती. गांवागांवात बायका व मुली मेहनतीची काम करत होती- घराच्या मातीच्या भिंती पुनः बांधून काढायचा प्रयत्न करत होती पण तरुण मुल- पत्ते खेळत होती. नशीब चोरी- दरवड्यासाठी इकडे तिकडे जात नव्हती- अशीही एक प्रतिक्रिया!
खूप संस्थांनी स्वतःच्या ट्रक्स मधून मदत सामान आणल होत. पण सरकारी यंत्रणा नसल्याने हे ट्रक्स हायवेवर थांबून थोड सामान वाटून पुढे जात. तिथे थांबे करून बसलेली तरुण मंडळी सामान गोळा करत आणि पुनः जाऊन पत्ते खेळत बसत.
मात्र आंध्र प्रदेश कडून तातडीने जी मदत आली- टेलिफो संपर्क यंत्रणा सुधारण्यासाठी, रस्ते मोकळी करण्यासाठी आणि इतरही खूप प्रकारांनी- त्यामुळे मात्र आम्हाला चंद्राबाबू नायडूच मुख्यमंत्री हवेत असे म्हणणा-यांचा एक मोठा वर्ग तयार झाला आहे.
आज वादळानंतर तीन महिने होऊनही इच्छाशक्ती आहे कां ही शंका कायम रहाते. पण कमी अधिक प्रमाणात सर्वच सरकारी यंत्रणेत ती जाणवत नाही कां?

चक्रीवादळाने किंवा हायजॅकिंग सारख्या घटेमुळे ती थोडी उघडी पडते एवढेच!
------------------------------------------------------------------------