मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

रविवार, 18 मार्च 2012

तरूणाई 2- समाज आणि स्वप्ने

तरूणाई - समज आणि स्वप्ने

कॉलेज विश्वात आपण स्वप्ने पहात असतो. अमुक होणार, हे करणार, या पदावर पोहोचणार, एवढे धन-वैभव मिळवणार !
दहावी ते बारावी या काळात आपल्याला पुढील प्रोफेशनल आयुष्याची दिशा ठरवायची असते. मी इंजिनिअर होणार ,डॉक्टर होणार, वैज्ञानिक होणार, वकील - चार्टर्ड अकौटंट , गायक, चित्रकार, शिक्षक, प्रोफेसर, उद्योजक वगैरे वगैरे ...! अलीकडे सिव्हील सर्व्हीसेसचे आकर्षणही वाढू लागले आहे आणि त्याचाही विचार कॉलेज- विद्यार्थी करू लागले आहेत.
असले कोणतेही प्रोफेशनल क्वालिफिकेशन मिळविण्यामागे उद्दिष्ट असते पैसा मिळविण्याचे. कारण आयुष्यात सुखोपभोग हवे असतील तर पैसा हवाच. पैशाने काय काय मिळू शकेल व ते आपण मिळवायचेच याचा विचार होऊ लागतो. उत्तम पगाराची नोकरी, गाडी, छानसा बंगला, सुट्टी सहलीसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाची सोय ! बस्स, कॉलेज वयात एवढेच दिसत असते. पण समाज परिस्थिती खूप वेगळी असते. कित्येक मुले मुली लांबचे अंतर कापून कॉलेजात येत असतात. बसने लांबच्या गावातून, कधी सायकलने, थोडंफार मोटर बाईकने आणि क्वचित कारने ! थोडक्यात ते शिक्षणही सुखासुखी होत नसते. अगदी शहराच्या ठिकाणी राहून कॉलेज करणारी मुले असली तरी कित्येकांचे जेवणाचे डबे गावाकडील घरून येत असतात आणि प्रसंगी त्या डब्याअभावी एखादा दिवस उपासही घडतो. अशा विद्यार्थ्यांचे स्वप्न कदाचित लठ्ठ पगार, आलीशान बंगला, गाडी असे नसेल. तरीही आता आहे त्यापेक्षा अधिक आर्थिक सुबत्ता हे स्वप्न सर्वांचेच असणार आणि त्यांत गैर काय? किंवा असे म्हणू या की त्यात गैर काय असूं शकते? मला जे गैर दिसते ते आहेत समाजाकडून परिस्थीतीमुळे त्यांच्यावर घडत असलेले काही संस्कार !
समाजाची कोणकोणती अंगे आज तरूण मनांवर संस्कार करीत आहेत? कोणते ग्रुप्स, कोणत्या संस्था त्यांना घडवीत आहेत? ठळकपणे मोजता येणाऱ्या संस्था म्हणजे शिक्षण व्यवस्था, शासन व्यवस्था व प्रसार माध्यमे. यांच्याकडून होणाऱ्या कोणकोणत्या संस्कारांमध्ये काय गैर आहे त्यांचा थोडासा मागोवा घेऊ या.
शिक्षण क्षेत्राने गेल्या 25 वर्षात मोठे व्यावसायिक रूप धारण केले आहे व या व्यवसायाला राजकीय कंगोरे देखील आहेत. गॉडफादर या गाजलेल्या कांदबरीचा लेखक मारियो पुझो याने काही वर्षानंतर गॉडफादर 2 ही कादबंरी लिहिली. पहिला डॉन म्हातारा होत असल्याने डॉनचे पद आता मुलाकडे आलेले आहे व विरोधक बव्हंशी मारले गेलेले आहेत अशा पार्श्वभूमीवर ही कादंबरी सुरू होते. पहिला
डॉन मुलाला म्हणतो -- मी डॉनगिरी करून खूप पैसा मिळवला. अघोषित सत्ताही उपभोगली. पण तुझ्या काळात तुला माझ्यासारखी, - माझ्या वळणाची डॉनगिरी करून चालणार नाही. आता तुला डॉनगिरीची दिशा बदलावी लागेल. आणि मला स्पष्ट दिसते की, ती दिशा आहे शिक्षण क्षेत्राची. कारण आपला पैसा तिथे गुंतवला जाऊ शकतो. जा ते क्षेत्र बळकाव. त्यातून तुझा राजकीय दबदबा वाढेल. नवी सत्ता मसल पॉवर मध्ये शोधू नकोस. ती शिक्षणसंस्थांच्या माध्यमात शोध.
ही कादंबरी वाचत असताना मला खूपदा प्रश्न पडला की लेखकाला भारतीय शिक्षण व्यवस्थेकडून तर ही कल्पना मिळाली नसेल ना?

शिक्षण संस्थेला व्यावसायिक रूप आले आहे असे म्हणताना व्यवसाय म्हणजे वाईट असे समीकरण कोणीही मांडू नये. खरे तर नैतिकता व सचोटी ठेऊन केलेला व्यवसाय हा समाजाला उत्कर्षाप्रत नेणाराच असतो. पण सचोटी नसेल तेंव्हा तोच व्यवसाय अपकर्षाकडे देखील नेऊ शकतो. तेच शिक्षण व्यवस्थेचे झाले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश देताना भरमसाठ फी, सोबत उकळलेली कॅपिटेशन फी यांच्या बदल्यात विद्यार्थ्याला द्यायचा असतो फक्त एक ठप्पा मारलेला कागद. शिक्षणसंस्थेसाठी सरकारकडून अत्यल्प मोबदल्यात मिळवलेल्या जमीनीच्या मोठया भागावर कमर्शियल डेव्हलपमेंटची परवानगी पण घेतलेली असते व त्यातूनही पैसे मिळतच असतात. नाही म्हणायला कॉलेजची बिल्डींग, फर्निचर, लॅब, लायब्ररी व स्पोर्ट फॅसिलिटी हे उभारावे लागते. तोच काय तो खर्च. शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी नोकरीवर घेतानाच त्यांच्याकडून भरपूर (लाखांच्या घरात) पैसे घेऊन झालेले असतात व त्यांना द्याव्या लागणाऱ्या पगारातील बराच पैसा शासन किंवा युजीसीकडून घ्यायचा असतो. शिक्षक किंवा प्रोफेसर हे लेबल चिकटलेल्या व्यक्तीला ते लेबल म्हणजे एक लायसेन्स असते. कॉलेजबाहेर खाजगी कोचिंग क्लास उघडण्याचे. कित्येकदा हे कोचिंग क्लासही त्याच शिक्षण संस्थेचे असतात. त्यातूनही विद्यार्थ्याकडून फी वसूल करता येते.
हा व्यवसाय असाच करायचा असतो. व त्या पैशाच्या मोबदल्यात विद्यार्थ्याला विद्या देण्याची गरज नाही -- फक्त सर्टिफिकेट द्यायचे असते -- हा संस्कार कळत - नकळत विद्यार्थ्यापर्यंत पोचत असतो. ज्ञान व विद्या महत्वाचे नसून सर्टिफिकेट महत्वाचे आहे हा संस्कार होत असतो. मात्र सुदैवाने इतर समवयस्क मित्रांबरोबर विचार, सुसंवाद, यांची देवाणघेवाण चालू असते. सहली, ट्रॅकिंग, स्पोर्टस्, आर्ट क्लब यांच्यातून चांगले संस्कार घडत असतात. काही आदर्शवादी शिक्षक या व्यवस्थेतही टिकून असतात. व स्वत:ला करावे लागणारे कॉम्प्रमाईजसचे दु:ख बाजूला ठेऊन चांगले शिक्षण, चांगली विद्या देऊन जातात. त्यातून शिक्षणाची, ज्ञानार्जनाची गोडी लागते. चांगले व वाईट, सारासार विवेक या गोष्टी कळू लागतात. हे कळण्यामागे त्या वयातील ऊर्जा व ऊर्मी यांचाही मोठा वाटा असतो. हा विवके मिळाल्यास अभ्यास, प्रयत्न, सातत्य, चिकित्सक बुध्दि, विचारमंथन या प्रक्रियांचे महत्व कळू लागते.
पण हा विवेक आणि ज्ञानार्जनाची गोडी सर्वांनाच मिळेल याची गॅरंटी नसते. आणि मिळाले तरी काही प्रसंगी ते एका दुसऱ्या संस्कारापुढे फिके पडतात. आणि तो संस्कार असतो रॅट रेसमध्ये सतत पुढे-पुढे जाण्याचा. त्यासाठी वेळप्रसंगी इतरांना मागे खेचण्याचा.

पी.टी. उषाच्या बाबतीत घडलेला हा प्रसंग. ऑलिम्पिकमध्ये ती छान पळाली होती. पण शेवटच्या लाईनवर येताना ज्याचे डोके प्रथम त्या लाईनच्या बाहेर येईल तो जिंकेल हा नियम तिला माहीत नसल्याने व मागच्या स्पर्धकाने पटकन डोके पुढे काढल्याने उषाचा विजय क्षणाच्या काही शतांशाने हुकला. म्हणजे त्या रेसमध्ये पळणे महत्वाचे होते पण नियम माहित असणे हे त्याहून महत्वाचे होते. शिक्षण क्षेत्र हे ही एक रेस झालेले असल्याने तुम्हाला ज्ञान असणे याला दुय्यम महत्व येऊन ज्ञानाचे प्रदर्शन करू शकणे याला महत्व आहे. विषय समजला नाही तरी उत्तर घोकून लिहिलेले चालेल. तसेच मास्तरांनी उत्तर समजावून देणे चालेल. त्याने तुमची विचारशक्ति वापरण्याची क्षमता कुंठित होत गेली तरी चालेल. असेही संस्कार होत असतात.
ज्ञानाची पहिली पायरी म्हणजे खरेपणा हा संस्कारही क्वचितच घडतो. इतरांचे जर्नल्स उतरवून चालतात. शिक्षकही तिकडे डोळेझाक करतात कारण त्यांनाही वेळ नसतो. पण मग जर्नल्सची पध्दत काढून का नाही टाकत हा प्रश्न विद्यार्थी विचारत नाहीत कारण 'का म्हणून' हा प्रश्न विचारायचा नसतो असाच संस्कार बिंबतो. मग लोकमान्य टिळकांची गोष्ट - 'मी शेंगा खाल्या नाहीत म्हणून मी टरफले टाकल्याची शिक्षा लावून घेणार नाही.' ही फक्त गोष्ट उरते. अन्यथा होणारच आणि त्याविरूध्द बोलायचे नाही हा संस्कार येतो. मग भविष्यात हे विद्यार्थी न्यायाची चाड ठेवतील कशावरून? अमाप पैसे खर्च करून डॉक्टर झालेला विद्यार्थी सेवाव्रताने डॉक्टरी कशी करणार? अमाप पैसे देऊन सिव्हील इंजिनिअर झाल्यावर सरकारी नोकरीत लागलेला असिस्टंट इंजिनिअर काय करणार?
खेळ, कलागुण, छंद यांना तर घरातून पालकांकडूनही सुरूंग लागतो. फक्त अभ्यास इतर गौण असेही संस्कार होऊ लागतात. मग इतर कलागुणांच्या योगे उघडे जाणारे कित्येक इतर करियर ऑप्शनदेखील मागे पडतात.
माझा भाचा कॉलेजच्या पहिल्या दुसऱ्या वर्षात असताना त्याने मला विचारलेला प्रश्न आठवतो. मावशी, सचोटीने लागणाऱ्या व्यक्तींना आपण सचोटीनेच वागावे ही प्रेरणा कुठून मिळते. त्या प्रेरणेचे स्त्रोत कोणते. हा प्रश्न सुचला हा ही एक चांगला संस्कार.
पुढे आपण याचेही उत्तर शोधायचे आहे.
---------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं: