2. सत्ता आणि सुव्यवस्था
दै. महाराष्ट्र टाईम्स, दि. 14-4-96
सुव्यवस्था ही सर्व सजीव प्राणी मात्रांची पहिली आणि मूलभूत गरज आहे. झाडे अचल असूनही ही सुव्यवस्था कशी राखतात हा फार दार्शनिक किंवा भौतिक शास्त्राचा प्रश्न असेल. मात्र इतर चल प्राणी, पशु, पक्षी, किडे, मुंग्या, माणसं यांची सुव्यवस्था कशी रहाते हा समाजशास्त्राचा विषय आहे. अपरिहार्य पणे असे दिसून येते की, सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी दृश्यमान, स्पष्ट दिसून येणार्या व जाणवणार्या सत्तेची गरज असते. सगुण निर्गुणच्या वादाचे हेच मूळ असावे.
............................................................पुढे वाचा
शनिवार, 20 सितंबर 2008
2/ 23 वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी झाला तर
2/23. वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी झाला तर
संपूर्ण स्वास्थ्य, दिवाळी अंक, पुणे, 1996
संपूर्ण स्वास्थ्य, दिवाळी अंक, पुणे, 1996
वैद्यकीय उपचारांचा खर्च कमी झाला तर ते सर्वांनाच हवे आहे.
लीना मेहेंदळे
संपूर्ण स्वास्थ्य, दिवाळी अंक ९६
वैद्यकीय खर्च कमी करण्याचे काही उपाय मला दिसतात. हा खर्च कमी व्हावा अशी ज्या डॉक्टरांची मनापासून इच्छा आहे त्यांनी एकत्र येणे, पेशंटबरोबर जाहीरपणे सुसंवाद साधणे, पेशंटला स्वतःच्या रोगाबद्दली माहिती असेल तर त्याचा उपयोग त्याला करु देणे, इतर आरोग्यपद्धतींबाबत स्वतःचे ज्ञान वाढवत रहाणे (पेशंट व डॉक्टर दोघांनी), अनावश्यक चाचण्या व औषध टाळणे.
वैद्यकीय सेवा दिवसेंदिवस महाग होत चालली आहे यात शंका नाही. याच्या विविध कारणांची यादी खालीलप्रमाणे करता येईल.
दिवसेंदिवस वाढणारी महागाई हे पहिले कारण. मात्र वाढत्या महागाईत सुद्धा प्रत्येक वस्तूची किंमत सारख्या प्रमाणांत वाढत नसते. वैद्यकीय सेवा ही सर्वांना लागत असल्यामुळे आणि या सेवेचा माणसाच्या आरोग्यावर तसेच जीवनावर तात्काळ प्रभाव पडत असल्यामुळे, त्यात होणारी महागाई इतरांपेक्षा कमी असावी अशी अपेक्षा असते. पण प्रत्यक्षात मात्र तीच इतर कित्येक बाबींपेक्षा जास्त वाढलेली दिसते.
सुमारे वीस, तीस वर्षांपूर्वी किमान निम्मे डॉक्टर असे सापडत की ज्याच्या दृष्टिने पेशंट कमी त्रासात व कमी खर्चात बरा होणे हे महत्वाचे असायचे. त्या काळात फॅमिली डॉक्टरांची पद्धत पण होती. डॉक्टरांना घरातल्या व्यक्तींची,
अडवचणींची, आजारपणाची चांगली माहिती असायची. ती पद्धत संपल्यामुळे आता पेशंट कमी खर्चात बरा होणे हे डॉक्टरांचे मूळ उद्दिष्ट असत नाही. त्या ऐवजी आपल्या ज्ञानाचा वापर करुन, प्रसंगी त्यात सुरवातीला वैयक्तिक पैशांची गुंतवणूक करुन, त्यातून जास्तीत जास्त पैसा कसा काढता येईल हेच उद्दिष्ट असलेल्या डॉक्टरांचे प्रमाणसुद्धा निम्म्यापेक्षा कितीतरी जास्त वाढलेले आहे. या वृतीचे समर्थन करणे सहज शक्य आहे. जर समाजतला सर्वात बुद्धिमान विद्यार्थीवर्ग वैद्यकीय अभ्यासकडे वळत असेल व हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी सर्वांत जास्त पैसे आणि मेहनत खर्च करीत असेल, तर त्याने खूप पैसे मिळविण्याचे उद्दिष्ट का ठेवू नये? हा प्रश्न विचारताना विसरले जाते ते हे, कि एका वैद्यकीय विद्यार्थ्याचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी जसा त्याला स्वतःला भरपूर खर्च येतो, तसाच साजाचादेखील भरपूर पैसा खर्च होत असतो. तर मग समाजाला त्याची सेवा परवडणाऱ्या किंमतीत का मिळू नये? मात्र समाजाच पैसा ही दृश्य वस्तू नसल्यामुळे या मुदद्यावर कोणत्याही डॉक्टरला जबाबदार धरले जात नाही.
वैद्यकीय खर्च वाढण्याचे तिसरे महत्वाचे कारण म्हणजे जास्तीत जास्त नवनव्या चाचण्या करण्यासाठी लागणारी उपकरणे आणि नवनवी औषधे बाजारात येणे. उपकरणे जितकी महागडी असतील तितके जास्त रोगी त्या मशिनकडे वळवलेच पाहिजेत. त्यामुळे रोग्याला चाचणीची गरज आहे का नाही यापेक्षा मशिनला रोग्याची गरज असणे महत्वाचे असते. यातून रॅकेट सुरु होते आणि जनरल प्रॅक्टिशनरला एखादी केस पॅथॉलॉजिस्टकडे पाठविण्यासाठी भला मोठा 'कट' दिला जातो. ही प्रथा इतकी वाढली की ऍलोपॅथीप्रमाणे आयुर्वेद, होमिओपॅथी इ. सर्व प्रकारचे डॉक्टर आता चाचण्यांना अवाजवी महत्व देऊ लागले आहेत व पॅथोलॉजिकल लॅबकडून हक्काने कट घेऊ लागले आहेत.
त्यातून रोग्याची पंचाईत अशी, की डॉक्टरने सांगितलेल्या चाचण्या वाजवी आहेत की अवाजवी हे तो स्वतः कसे ठरवणार? पूर्वी फक्त बाह्य लक्षणांवरुन रोगिनदान केले जात असे. आता "जर जास्त चाचण्या करून जास्त अचूक निदान करता येत असेल तर का करु नये" असे समर्थन सर्व डॉक्टर करु शकतात. शिवाय कमी
चाचण्या करुन उद्या त्याचे निदान चुकले तर आणि चुकीचे औषध दिले गेले तर रोगी ग्राहक संरक्षण न्यायालयात जाण्याचा धोका डॉक्टरला नको असतो. रोग्यालासुद्धा स्वतःच्या जिवाशी खेळ असल्याने टेस्ट न करण्याचा धेका पत्करावा किंवा नाही याचा निर्णय घेणे सोपे नसते.
तीच गोष्ट औषधांची. सगळ्या नवीन औषधांच्या कंपन्या खप वाढण्यासाठी डॉक्टरांबरोबर अंडरहॅण्ड व्यवहार करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यातून रोग्यावर औषधाचा भडिमार करणे, गरज नसलेली व्हिटॅमिन्स व टॉनिक्स लिहून देणे, ज्या औषधाचे दुष्परिणाम कळले नाहीत त्यांचाही समावेश करणे या नित्याच्या बाबी झालेल्या आहेत.
तीच गोष्ट मोठी मोठी हॉस्पिटल्स बांधणाऱ्यांची किंवा अपोलो सारखी चेन हॉस्पिटल्सची कंपनी तयार करणाऱ्यांची. या सगळ्यांना रोजच्या रोज किमान रोगी मिळाले नाहीत तर त्यांचे अर्थकारण कोलमडून पडते. या अर्थकारणाचा बोजा देखील पेशंटवरच पडतो. त्याला मोजावी लागणारी वैद्यकीय किंमत वाढते.
वर सांगितलेली किंमत वाढण्याची कित्येक कारणे अनैतिक आहेत, पण त्यातल्या बहुतेक बाबी उपयुक्त, गरजेच्या व धोका कमी करणाऱ्या सुद्धा असू शकतात. अशा परिस्थितीत पेशंटला दिलेला महागडा सल्ला त्याच्या खऱ्या हिताचा व खऱ्या गरजेचा आहे का नाही हे फक्त डॉक्टरलाच माहीत असते व ते त्याच्या सदसदविवेकबुद्धीवरच अवलंबून रहाते.
वैद्यकीय सल्लयाची वाढीव किंमत जनतेच्या खिशाला परवडते का नाही हा महत्वाचा मुद्दा नसून, या किमती कमी झाल्या तर सर्वांनाच हव्या आहेत हे महत्वाचे आहे. तसेच किंमती काहीही राहोत पण त्या किंमतीच्या लायकीची खरी व प्रामाणिक वैद्यकीय सेवा मिळते की नाही, हा पण महत्वाचा मुद्दा आहे. या दोन्ही मुद्यांची पूर्तता व्हायची असेल तर आरोग्य-शिक्षण देणे हा आरोग्य सेवेचा एक मूलभूत घटक असला पाहिजे. यासाठी डॉक्टरांनी पेशंट बरोबर त्याच्या आजारपणाची व्यवस्थित चर्चा केली पाहिजे. कोणते औषध काय कारणासाठी दिले जात आहे, कोणत्या टेस्टचा काय फायदा वा तोटा आहे, त्या टेस्टचे किंवा औषधाचे काय दुष्परिणाम होऊ शकतात याची चर्चा केली पाहिजे.
पुण्यात सर्व प्रकारच्या पॅथीजचे मिळून पाच हजारांपेक्षा जास्त डॉक्टर असावेत. (पुण्याची लोकसंख्या २५ लाख आहे. ) यातील माझ्या माहितीचे काही डॉक्टर पेशंटबरोबर त्यांच्या आजारपणाची सखोल चर्चा करतात. पण अजनूही एकाही डॉक्टरच्या दवाखान्यावर मी अशी पाटी पाहिली नाही की मी माझ्या पेशंटबरोबर सखोल चर्चा करण्याचा अभिमान बाळगतो, किंवा तुम्चया रोगाबद्दल समजावून घेणे हा तुमचा हक्क आहे. कुणी डॉक्टर जाहीरपणे पेशंटला त्याचे ज्ञान वाढवण्याची जाणीव करुन देत असतील तर ग्राहक मंचाने त्यांचा सत्कार केला पाहिजे.
सध्या स्पेशलायझेशनचा जमाना आहे. तसेच कुणीतरी हॉस्पिटल बांधून त्यांत वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या सेवा काँट्रॅक्टवर वापरु देण्याची पण पद्धत सुरु आहे. अशा एका प्रथितयश हॉस्पिटलच्या प्रथितयश स्त्रीरोगतज्ज्ञाकडे माझ्या आईचे ऑपरेशन ठरले. ऑपरेशन पूर्ण करून डॉक्टर व ऍनेस्थेटिस्ट घरी गेले. पुढे सर्व काही नर्सेसनी करायचे होते व ४८ तासात डिसचार्ज मिळणार होता. आईची गुंगी उतरण्यासाठी किती वेळ लागेल, वगैरे वगैरे कशाचीही माहिती मला दिलेली नव्हती. अर्थात नियमाप्रमाणे ऑपरेशनपूर्वी एका फॉर्मवर माझी सही घेतलेली होती. त्यात म्हटले होते की अमुक डॉक्टरांनी मला ऑपरेशनबद्दल सगळी माहिती दिली
आहे (म्हणजे नेमकं सांगायच तर काहीही नाही) व पेशंटला काहीही झाले तर त्याची जबाबदारी डॉक्टरांवर नसून माझ्यावर असेल.
आहे (म्हणजे नेमकं सांगायच तर काहीही नाही) व पेशंटला काहीही झाले तर त्याची जबाबदारी डॉक्टरांवर नसून माझ्यावर असेल.
प्रत्यक्षात तीन तास होऊन गेले तरी गुंगी उतरली नाही. एव्हाना तिथल्या नर्सेसनी चार वेळा नाडी तपासली होती व काहीतरी गडबड आहे, असे त्यांच्या कुजबुजीवरुन वाटत होते. पण मी वारंवार विचारूनही त्या मला काही सांगत नव्हत्या. 'मी डॉक्टरना फोन करु का?' या प्रश्नाचे उत्तर सारखे 'नको' असेच होते तेवढयात माझी डॉक्टर बहीण तिथे पोहोचली. तिने इमर्जन्सी आहे हे ताबडतोब ओळखले. पण तिच्या सूचनांवर नर्सेसचा रिस्पॉन्स ढिम्म ! सुमारे अर्ध्या तासानंतर ऑपरेशन करणारे डॉक्टर फोनवर सापडले, लगेच आले, सर्व तपासण्या केल्या आणि लगेच ह्रदरोगतज्ज्ञाला बोलावून घेतले. हार्ट ऍटॅक येऊन गेला एवढेच आम्हला सांगण्यात आले. संध्याकाळपर्यंत आईची प्रकृती इतकी खालावली होती की तिला ICU मध्ये टाकावे लागले. माझ्या जोडीला माझी डॉक्टर बहीण आणि एक रिटायर्ड सिव्हिल सर्जन पण होते. पण त्या कार्डिऑलॉजिस्टने मी सर्वज्ञ आहे व पेशंटच्या अडाणी नातेवाइकांबरोबर बोलण्याची माझी जबाबदारी नाही, असाच चार दिवस धोशा लावला. स्त्रीरोगतज्ज्ञाचे म्हणणे, 'मी कार्डिऑलॉजिस्ट नाही, मला काही विचारु नका. तुमच्यासाठी पुण्यातला बेस्ट कार्डिऑलॉजिस्ट आणला आहे. पटत नसेल तर तुमच्या जबाबदारीवर दुसरे कार्डिऑलॉजिस्ट आणतो. He will keep you humoured. पण ते तांत्रिक माहिती काय सांगतील याची मात्र मी गॅरंटी घेणार नाही. मला माहिती देण्याची तुमची जबाबदारी नाही का यावर त्यांचं उत्तर होतं, नाही. मी माझे ऑपरेशन व्यवस्थित केले आहे. तुम्हाला काही सांगण्याची जबाबदारी माझी नाही. पण निदान तुम्ही त्या कार्डिओलॉजिस्टना आमच्याशी बोला असे सांगू शकत नाही का याही प्रश्नाला त्यांचे उत्तर होते "नाही, त्यांनी कसे वागावे, ते तेच ठरवतील". शेवटी तीन दिवसांनंतर त्या हृद्रोगतज्ज्ञ डॉक्टरच्या वृद्ध व आदरणीय प्रोफेसरांना गाठून मी विनंती केल्यावर व त्यांनी शिष्याला आदेश दिल्यावर हा तज्ज्ञ माझ्या बहिणीशी थोडेसे बोलू लागला. पुढे सुदैवाने आई त्या संकटातून निभावली. एकूण बिल चाळीस हजाराच्या वर. पण एका शब्दानेही त्या स्त्रीरोगतज्ज्ञाने असे म्हटले नाही की माझ्या स्टाफने मला वेळेवर बोलावले असते तर बरे झाले असते. माझ्यासारख्या उच्चशिक्षित, इतर डॉक्टरांची मदत हाताशी असणाऱ्या पेशंटची ही कथा, तर इतरांचे काय? खर्च केलेल्या चाळीस हजार रुपयांच्या बदल्यात आई निभावली एवढीच त्या पैशाची आमच्या दृष्टीने किंमत. पण डॉक्टराच्या एकूण श्रमाची, औषध योजनेची किंवा सल्लयाची (जो न देणे हेच त्यांचे ब्रीद वाटत होते) एकूण किंमत चाळीस हजार होती, असं मला अजूनही वाटत नाही. त्याऐवजी जर ते आमच्याशी चर्चा करत राहिले असते तर आमची रुखरुख व तक्रार संपली असती.
सध्या ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत वैद्यकीय सेवा देखील आणून सोडल्यामुळे डॉक्टरांमध्ये बराचसा राग व बरीचशी भीती आहे. या कायद्याचा उद्देश डॉक्टरांवर काहीतरी बंधन घालावे असा आहे. चुकार डॉक्टरांना इतर प्रयत्नांनी वेळीच थांबवता आले असते तर त्या कायद्याची गरज पडली नसती. कायद्याची भाषा थोडी बाजूला ठेऊ या. पण निदान जे डॉक्टर चुकार नाहीत त्यांचे उदाहरण त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवायला काय हरकत आहे? निदान असे कुणी डॉक्टर असू शकतात असे तरी लोकांना वाटेल. रिक्षावाल्यांनी प्रमाणिकपणा दाखवला तर पेपरांमध्ये त्याची चर्चा येतेच की नाही?
डॉक्टर पेशंटची चांगली चर्चा झाल्यास अनेक फायदे आहेत. दुर्देवाने ते फक्त पेशंटलाच आहेत असे कित्येक डॉक्टरांचे मत असते. त्यामुळे या चर्चेत मी माझा वेळ खर्च करुन माझे उत्पन्न का बुडवू असा प्रश्न कोणीही डॉक्टर विचारतो. डॉक्टरांमधली ही प्रवृती घालवण्यासाठी फक्त कायद्याचे बंधन घालून पुरणार नाही तर इंडियन मेडिकल असोसिएशन, ग्राहक पेठ सारख्या मोठया देशव्यापी संस्थापासून तर रोटरी क्लब, वेगवेगळ्या डॉक्टरांच्या वार्षिक मिटिंग्ज वगैरेसारख्या छोटया छोटया संत्रामध्ये देखील ही चर्चा घडवून आणायला पाहिजे. महाराष्ट्रात आरोग्य या एकाच विषयाला वाहून घेतलेले कित्येक मासिक किंवा वार्षिक अंक निघतात. पण डॉक्टर-पेशंट सुसंवादासाठी काही करताना ते दिसून येत नाहीत.
या सुसंवादाच्या मुद्यातून दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा निघतो. पेशंटबरोबर चर्चा करताना डॉक्टर खरोखर किती ज्ञानवंत असतात? आपले ज्ञान वाढावे याचा त्यांनी किती प्रयत्न केलेला असतो? अशा ज्ञानवाढीची नेमकी दिशा कोणती असते? त्याचा फायदा पेशंटला व्हावा याची तळमळ किती डॉक्चरांना असते? आणि पेशंटचे स्वतःच्या आरोग्याबाबत किंवा रोगाबाबत जे काही ज्ञान असेल त्याला कितपत महत्व किंवा मान देण्याची डॉक्टरांची तयारी असते?वैद्यकीय सल्लाचा खर्च कमी करायचा असेल तर हे प्रश्न महत्वाचे ठरतात.
सध्याच्या आपल्या वैद्यकीय शिक्षणामध्ये एक मोठा दोष राहिलेला आहे तो आहे अस्पृश्यतेचा. ऍलोपॅथी डॉक्टरच्या दृष्टीने आयुर्वेद, होमिओपॅथी, निसर्गोपचार, योग इत्यादि आरोग्याच्या सर्व इतर पद्धती या अस्पृश्य असतात. मग पेशंटच्या दृष्टीने त्या कशाही असोत. मुळात पेशंटचा काही दृष्टीकोन असू शकतो हेच ज्या डॉक्टरांना मान्य नाही ('डॉक्टर कोण'? तो का मी?' टाईप वृत्ती) त्यांची मला इथे चर्चा करायची नाही. पण जे डॉक्टर पेशंटबरोबर चर्चा करायला व सुसंवाद साधायला कबूल आहेत त्यांनी देखील या इतर पद्धतीचा जोपर्यंत थोडाफार अभ्यास केलेला नाही, तोपर्यंत नुसत्या सुसंवादाने पेशंटचा खर्च कमी होऊ शकत नाही. तरीही पुण्यासारख्या,
देशातील सर्वात जागरूक शहरातही आरोग्याच्या वेगवेगळ्या पद्धतींची जाणीव करुन घेण्यासाठी किंवा त्यांची आपापसातील अस्पृश्यता घालवण्यासाठी कोणतीही संस्था किंवा कोणतीही चर्चासत्र ऐकिवात नाही. इतर काही कमी जागरुक शहरांचे सोडून द्या.
नुकतीच भिवंडी विषबाधेची दुर्देवी घटना घडली. जवळ जवळ तीनशे पेशंटपैकी पहिल्या आठ दिवसांत किमान पन्नास पेशंट दगावले. पण त्याहीपेक्षा दुर्देवाची घटना म्हणजे ज्या सरकारी दवाखान्यात हे पेशंट होते, तिथे त्याच सरकारच्या आरोग्यमत्र्यांनी पुण्यातल्या काही आयुर्वेद्यांना निमंत्रण देऊन बोलावून घेतल्यावर, त्या सरकारी दवाखान्याच्या सरकारी डॉक्टरांनी इथे आयुर्वेदाचे उपचार देऊ देणार नाही असा पवित्रा घेतला. दवाखाना सरकारच्या म्हणजे लोकांच्या पैशातून लोकांसाठी होता की इतर कोणाचा होता? पन्नास पेशंट दगावल्यानंतरही ट्रीटमेंट उपलब्ध करुन देणे जास्त महत्वाचे होते की ऍलोपॅथीचा झेंडा उंच फडकवत ठेवणे? (प्राण गेला तरी हा झेंडा खाली ठेवणार नाही वगैरे..) या घटनेत नेमकं काय घडलं त्याची चर्चा कुणीच केलेली दिसत नाही. मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यानी,
आरोग्यसचिवांनी पुण्याहून गेलेल्या आयुर्वेद्यांनी,
मुंबईतल्या त्या सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टरांनी, वृत्तपत्रांनी,
त्या दवाखान्यातील विषयबाधित रुग्णांनी किंवा त्यांच्या नातेवाईकांनी, सुजाण नागरिकांनी, कुणीच नाही.
वैद्याकीय खर्च कमी करण्याचा एक उपाय पेशंटच्या हातात पण असतो. तो म्हणजे आपल्या आजारपणाबद्दल व रोग घालवण्याच्या विभिन्न पद्दतींबद्दल जास्तीतजास्त माहिती करुन घेणे.
मी 'राष्ट्रीय प्राकृतिक चिकित्सा संस्थान' या सस्थेत डायरेक्टर असताना डायबिटीस बाबत असा एक कार्यक्रम केला होता. पुण्यातील मधुमेहाचे तीस पेशंट या कार्यक्रमात सहभागी झाले होते. आठवडयातून एकदा तीन तासांसाठी त्यांची बैठक होत असे. यात त्यांना मधुमेहाबद्दल समग्र माहिती दिली गेली. ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमियोपॅथी,
निसर्गोपचार, योगासने, ऍक्युप्रेशर इ. प्रत्येक पद्धतीत मधुमेहाबद्दल नेमके काय म्हटले आहे? स्वतःच टेस्टिंग करु शकणारी नवीन सोपी उपकरणं बाजारात कोणती आहेत ? इतर पद्धतीतले उपाय आहेत? इतर पद्धतीतले उपाय वापरुन बघताना नेमके काय काय अनुभव आले? त्यामुळे ते घेत असलेला इन्शुलिनचा डोस कमी करता आला का? नेमका कसा कसा हा डोस कमी केला? तीन महिन्यांत अशी बारा चर्चासत्रे झाली. चर्चेमधे आलेल्या पेशंटनी वेगवगळे उपाय करुन बघितल्यावर काय काय अनुभव आले व इन्शुलिनचा डोस कसा कसा कमी करता आला या मुद्यावर मोठा भर असल्याने सर्वांनाच तसे प्रयोग करुन बघायला प्रोत्साहन मिळत होते. ससूनच्या दोन डॉक्टरांनी काहीही इमर्जन्सी अचानक उद्भवल्यास रात्री-बेरात्री कधीही उठावा असे सांगून ठेवले होते. त्यांना फक्त एकदाच डिस्टर्ब करावे लागले. पेशंटनी करून बघण्याच्या उपायांमधे भरपूर चालणे, चालताना मौन बाळगणे, कच्च्या भाज्या, उकडलेल्या भाज्या, मोड आलेली मेथी, आवळा,
भुई-आवळा यांचा वापर, दुपारची झोप (वात प्रकृतिच्या लोकांनी घेऊ नये, इतरांनी घेऊन चालेल) हे प्रमुख होते. स्वतः इंजेक्शन कसे घ्यावे इथपासून तर इन्शुलिनचा डोस कमी कमी करत असताना त्याचा डेली चार्ट कसा तयार करावा, होणारे शारिरिक बदल काय सांगतात, वेगवेगळ्या पेशंटच्या चार्टची चर्चा, चहा-कॉफी कुणाची कशी कमी झाली, कुणाची निरुत्साही वृत्ती कशी कमी झाली वगैरे वगैरे खूप विषयांची चर्चा झाली. अशासारखे प्रयोग इतर कित्येक क्षेत्रात करुन बघण्यासारखे आहेत. वैद्यकीय सल्ल्याचा खर्च कमी करण्याचा हाही एक चांगला उपाय असू शकतो.
माझ्या एका मोठया आजारपणात मला एका प्रथितयश डॉक्टरांकडे नेण्यात आले. मध्यस्थांच्या मते ते डॉक्टर म्हणजे देव. त्यांचा वेळ घेणे किंवा त्यांना प्रश्न विचारणे वगैरे वगैरे म्हणजे घोर अश्रद्धा व उद्धटपणा. (या मुद्यावर पुढे माझे त्या मध्यस्थांबरोबर कायमचे बिनसले.) स्वतः डॉक्टर मात्र खरंच देवामाणूस होते. मी त्यांना स्पष्ट सांगितले, माझे आजारपण नेमके कसे उद्भवले ते मला समजावून सांगा. तसेच तुमची औषधं नेमके काय काय घडवून आणतात हे मला सांगा. म्हणजे माझ्या शरीरावर त्याच प्रकारचा प्रभाव टाकणारे पण आयुर्वेदातले किंवा बाराक्षारातले उपाय मला आधी वापरुन बघता येतील. त्याचा उपयोग नाही झाला तर मी पुन्हा तुमचे औषध घ्यायला तुमच्याकडे येईन. अशा प्रश्नाचा ज्याला राग येत नाही तो माझ्या मते खरा डॉक्टर. त्या डॉक्टरांनी मला समाजवून दिले. मी माझीच औषधे घेतली व बरी पण झाले. (याची त्यांनीच चाचणी करून खात्री केली.) माझी औषधे कोणती हे त्यांनी विचारले नाही. मात्र खूप वर्षांनी त्यांना स्वतःला ऍलर्जीचा मोठा त्रास झाला, तेव्हा त्यांनी आपणहून माझी पुस्तकं मागून घेतली. त्यातील औषधांचा त्यांच्या पद्धतीने अभ्यास करुन उपयोग करुन घेतला.
थोडक्यात सांगायचे तर वैद्याकीय खर्च कमी करण्याचे काही उपाय मला दिसतात. हा खर्च कमी व्हावा अशी ज्या डॉक्टरांची मनापासून इच्छा आहे त्यांनी एकत्र येणे, पेशंटबरोबर जाहीरपणे सुसंवाद साधणे. पेशटला स्वतःच्या रोगाबद्दलची माहिती असेल त्याचा उपयोग त्याला करु देणे, इतर आरोग्यपद्धतींबाबत स्वतःचे ज्ञान वाढवत रहाणे (पेशंट व डॉक्टर दोघांनी), अनावश्यक चाचण्या व औषधे टाळणे. पण या सगळ्यासाठी आधी चर्चेला जागा करुन देणे महत्वाचे आहे. ती संपादकांनी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन !
-----------------------------------------------------
सदस्यता लें
संदेश (Atom)