मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

रविवार, 1 अप्रैल 2012

आकर्षण श्रीमंतीचे आणि दिशाभ्रम


आकर्षण श्रीमंतीचे आणि दिशाभ्रम

प्रशासकीय सेवेतून निवृत्तिनंतर सध्या माझे कार्यक्षेत्र बंगलोर आहे, पण मधून मधून मला मुंबईची ड्यूटी दिली जाते. त्या काळांत माझे वास्तव्य हैद्राबाद इस्टेट येथे पाहुणी या नात्याने असते.

हैद्राबाद इस्टेट -- केंद्र शासनाचे मुंबईतील अति वरिष्ठ अधिकारी इथे रहातात. त्यांचा दर्जा राज्यशासनाचे सचिव किंवा प्रधान सचिव एवढा  वरिष्ठ असतो. शिक्षणक्षेत्रातील एक पडझड त्यांच्याही लक्षांत येत असेल. दिवसेन दिवस ही पडझड जास्तच समस्यामूलक होत चालली आहे हे ही त्यांना उमगत असेलच.
आणि खरं सांगायचं तर माझ्याही सेवेच्या काळांत ही पडझड मला दिसतच होती, आणि माझ्यासारख्या इतर कित्येक वरिष्ठ अधिका-यांना देखील.

पण ही समस्या लहानपणी पाठ केलेल्या हम्प्टी-डम्प्टीच्या कवितेसारखी आहे. भिंतीवर बसलेला हम्प्टी-डम्प्टी खाली पडून फुटतो आणि त्यानंतर -- ऑल दि किंग्ज हॉर्सेस अँण्ड ऑल दि किंग्ज मेन कुड नॉट पुट हम्प्टी-डम्प्टी बॅक अगेन. तीच अवस्था याही समस्येची होतांना दिसते.

हैद्राबाद इस्टेट -नेपियन सी रोड -- मुंबईतील उच्चभ्रू वस्तीची जागा. घरांना सर्व्हंट क्वार्टर  आहेत आणि प्रत्येक क्वार्टरमधे सर्व्हंट रहात आहेत. पण हे काही सरकारी वर्ग चारचे कर्मचारी नाहीत, तर ते आहेत साधे सुधे डोमेस्टिक सर्व्हंट । नवरा बायको मिळून महिन्याची कमाई फारतर आठ-दहा हजार रुपये. प्रत्येकाची किमान दोन मुलं -- शाळेत जाण्याच्या वयांतली -- प्रसंगी केजीची.

तर मी ज्या घरांत पाहुणी उतरते तिथेही सर्व्हंट बाई आहे, तिची दोन मुले क्रमाने  सहावी व  पाचवीत जातात. इंग्रजी माध्यमाची शाळा, प्रत्येक मुलाची वार्षिक फी  पंधरा हजार रुपये. पण शाळेची बस कम्पल्सरी -- बसभाडेही पंधरा हजार. आईवडील कमी शिकलेले  - इंग्रजी न येणारे । शाळेत शिकवलेले मुलांना समजत नाही म्हणून ट्यूशन लावलेली -- तिथेही प्रत्येकी दरमहा पाचशे रुपये -- म्हणजे वर्षाचा खर्च बारा हजार.

शाळेतही आणि ट्यूशनच्या वर्गातही सगळा भर मुलांकडून वाक्य घोकून घेण्यावर. मुलांची ऑप्टिकल मेमरी खूप छान वाढलेली आहे -- कारण वाक्यातले पहिले दोन शब्द ऐकून त्यांना कळते की वहीच्या कोणत्या भागांत, कुठे,  हे वाक्य लिहिले आहे, मग त्यावरून त्यांना पूर्ण वाक्य पण आठवते, आणि घोकल्याबरहुकूम उत्तर देता येते.   पण दुसरी एखादी वही समोर धरून मी तेच दोन शब्द उच्चारले तर मुलांचा गोंधळ होऊन ते वाक्य त्यांना सांगता येत नाही.

रिझल्ट काय म्हणून विचारता ? परिक्षेत नापास होण्याची भिती आहे का -- मुळीच नाही. त्या बाईने मला प्रश्न विचारला -- ताई, टीचर सांगतात मुलांना काही येत नाही, फेल होतील, मग शाळेतून काढून टाकू.  पण ताई, नियमाप्रमाणे आठवी पर्यंत मुलांना फेल करता येत नाही ना ! मग ते शिक्षक फेल कसं करू शकतील माझ्या मुलांना ? म्हणजे त्यांची धमकी पोकळच आहे ना?

पण हे तिने तात्पुरत्या समाधानासाठी शोधलेले उत्तर आहे. एरवी तिची कायम काळजी हीच आहे की एवढा उरस्फोड होईपर्यंत खर्च आणि तरीही मुलांच्या पदरांत कांहीच पडत नाहीये. मग ती वारंवार आम्हाला विचारते ताई, सांगा ना, काय करू ?

पहिल्या दिवशी मी तिला सांगितले -- मुलांना इंग्रजी शाळेतून काढ -- मराठी शाळेत घाल. निदान त्यांना विषय तरी कळायला लागेल. हे सांगतांना माझी जीभ चाचरत होती आणि तिनेही प्रश्न विचारलाच -- ताई, तुमच्या मुलांना तुम्ही इंग्रजी शाळेत घातलं आणि आता ती फॉरेन मधे आहेत.  इंग्रजी नसेल तर माझी मुलं श्रीमंत कशी होणार ?

सुदैवाने माझी आई तिथेच होती म्हणून मला तिची साक्ष काढता आली. मी बाईला म्हटले -- माझे तीन मुद्दे नीट ऐक. पहिला -- मी स्वतः इंग्लिश माध्यमाच्या शाळेत नाही गेले आणि तरी मी एवढी वरची नोकरी मिळवलीच ना -- कारण मला विषय येत होते. दुसरा मुद्दा -- माझ्या मुलांना घरी सर्व अभ्यास मराठीतून करायची सवय लावलेली होती. त्यासाठी दरवर्षी सर्व विषयांचे सर्व पुस्तकांचे दोन सेट आमच्या घरी आणत होतो. मुलांना ट्यूशन नव्हती कारण घरातील मोठी माणसे शिकवू शकत होती. हाँ, त्यांना उत्तरं लिहितांना इंग्लिशमधे लिहायचा सराव  ठेवला होता. तिसरा मुद्दा -- इंग्लिश आले  तरच श्रीमंती येते असं कुठे आहे

मग तिने मराठी शाळांबाबत तिचा मुद्दा मांडला. नेपियन-सी रोडच्या आसपास मराठी शाळा नाही -- कुठेतरी लांब जावे लागेल -- त्यांची बस-सर्व्हिसही नसते. मुख्य म्हणजे तिथेही िशिकवत नाहीतच  --तिथेही वेगळी ट्यूशन लावावीच लागणार. नेपियन-सी रोड या भागांत चांगली मराठी ट्यूशन मिळू शकत नाही. आता बोला.

मग मी तिला माझ्या परीने तोडगा सांगितला -- सर्व पुस्तकांचा मराठी सेट आण. मुलांना ती पुस्तकं मोठ्याने वाचून काढायची सवय लाव.आणि हे ही लौकर कर. जसंजसं मुलं वरच्वा वर्गांत जातात तसेतसे  त्या त्या विषयाचे पारिभाषिक शब्द वाढत जातात त्यामुळे उशीर केलास तर मराठीतूनही विषय समजणार नाही.

हे तिला काही केल्या पटले नाही. पुस्तकांचा वेगळा खर्च डोक्यावर बसेल हे कारण आधी सांगितल -- मी तो खर्च देउ केला तशी म्हणाली की नको - मुलांना एवढे वाचन पेलणार नाही आणि वेळ तरी कुठे मिळणार आहे
पण खरे कारण बहुधा हेच होते कि मराठीचा स्पर्श देखिल मुलांना न व्हावा -- तरच त्यांचे श्रीमंत होण्याचे काही चान्सेस आहेत.

या वातावरणांत आपली पुढची पिढी काय आणि कसं शिकणार आहे हा प्रश्न मला छळत रहातो.
------------------------------------------------------------------------------------------------
छान लेख आहे, आणि डोळ्यात अंजन घालणारा आहे. हा लेख प्रसारित करायची माझी खूप इच्छा आहे. पण लहान तोंडी मोठा घास म्हणून एक प्रश्न विचारायचा होता. सोशल मिडीयावर खोडसाळ कमेंट करणारे, आणि लोकांची दिशाभूल करणारे अनेक आहेत, तर ते लोक तुमच्या मुलांचे शिक्षण इंग्रजी माध्यमात झाले आणि तुम्ही मराठी माध्यमाबद्दल लिहित आहात, असे म्हणून विषयाची हवा काढू शकतात. त्या लेखात, अजून एक वाक्य जोडाल का? कि इंग्रजी माध्यमात मुलांना तुम्ही का शिकवले? माझ्या मते तुमची नोकरी फिरतीची असल्याने तुम्ही ते केले असावे, आणि साहजिक आहे अशा केसमध्ये इच्छा असून देखील आपल्या मुलांना आपण मराठी माध्यमात शिकवू शकत नाही.. पण हेच तुम्ही त्या लेखात टाकले तर अजून छान होईल... - सुचिकांत
Monday 9:53am
माझी बदलीची नोकरी त्यांत केंद्र सरकारव प्रसंगी इतर राज्यामधेही जायला लागू शकत होत -- हा विचार मनात होताच. घराजवळची शाळाच जास्त चांगली म्हणून मुंबईतील कॉलनामधील मराठी शिशुवर्गात सुरुवात केली. पुण्याला अभिनव मराठी मीडीयमला घातले. धाकट्याचा शिशुवर्गही मराठीच होता. पुढे इंग्रजी माध्यमात टाकले पण चौथीची स्कॉलरशिप परिक्षेची सर्व तयारी मराठीतून करून मराठीतूनच परीक्षा दिल्या -- हेतू हा कि मराठी यावे -- घरचा अभ्यास सगळा मराठीतूनच आणि गणित तर हमखास. हिंदीपण माझ्याइतकेच नाही तरी तोडीचे असावे म्हणून हिंदीचेही भरपूर वाचन. आता माझा नातू अमेरिकेत आहे. तो घरी मराठी हिंदी नेपाली व शाळेत मॅण्डरीन मधे बोलते. येणारे पाहुणे इंग्रजी बोलतातच -- ते त्याने स्वतः शिकले. इतक्या भाषांमुळे मुलांचा गोंधळ होतो ही थियरी खूप चूक आहे, असे आमच्या उदाहरणावरून सांगता येईल.


मला तर हेच कारण वाटत होते .. पण तुम्ही याच कारणाने मुलांना इंग्रजी माध्यमात शिकवले हे मी आत्मविश्वासाने सांगू शकत नव्हतो ना ..

म्हणून एकदा तुम्हाल विचारून घ्यायचे होते मला..
होय म्हणूनच एवढे विस्ताराने सांगितले


कोई टिप्पणी नहीं: