मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

गुरुवार, 22 सितंबर 2016

चिंतामण मोरया

चिंतामण मोरया
                                   ... लीना मेहेंदळे

       माझ जन्मक्षेत्र धरणगांव, माझ्या आजोबांच्या तरुण वयात हे गांव तालुक्याचे शहर बनू शकेल या क्षमतेच होत.  तस झाल नाही कारण गांवाला बारा महिने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारे साधन नाही, नदी नाही म्हणून ब्रिटिश राजवटीत धरणगांव ऐवजी पंधरा किलोमीटर दूर असलेल एरंडोल हे तालुक्याच ठिकाण झाल. अगदी अलीकडे - पाच सात वर्षापूर्वी धरणगांव हा वेगळा तालुका करण्यांत आला.
       माझा जन्म घरातच झाला.  आई सांगते, जेव्हा अस वाटल की आज उद्यात कांही तरी होणार आहे, तेव्हा घरातली सर्वांत मोठी खोली - म्हणजे देवघर रिकामी केली आणी खाट वगैरे टाकून तिथेच तयारी केली.  माझी आत्या आणी गांवातली एक सुईण यांनी मिळून बाळंतपण केल.  दुपारी दीड दोन ची वेळ होती.  वडील नोकरी निमित्त बाहेर होते. आजोबा दुपारच्या जेवणासाठी दुकानातून घरी आलेले.  मुलगी झाली समजल्यावर थोडया कष्टी मनाने दुकानात परत गेले.  दुपारी त्यांच्या कडे अचानक दोन तरुण आले.  साडेतीन हजार रुपये घेऊन. त्यांच्या वडिलांनी पूर्वी कधी तरी दुकानातून मोठी उधारी घेतली होती.  आर्थिक तंगी मुळे ती फेडायला जमली नव्हती. पुढे परिस्थिती सुधारली पण माणूस फार आजारी झाला.  त्यातच मरण पावला. पण मरतांना बजाऊन गेला 'अरे त्या सज्जन ब्राह्मणाचे पैसे बुडवू नका, वचन द्या.' म्हणूनच तेरावा उरकल्यावर दोघ मुल पैसे फेडायला माझ्या आजोबांकडे आली होती.
       मग तर आजोबांनी लगेच दुकान बंद केल - नवजात नातीसाठी सोन्याची चेन आणी शेजारी पाजारी वाटायला मिठाई घेऊनच आले.  बडी बेटी धनाची पेटी अस सर्वांना सांगून टाकल.  योगायोग असा की माझ्या दर वाढदिवसाला आई वडिलांना कुठून तरी लहान - मोठा अवचित धन लाभ होत आलेला आहे. रक्कम क्षुल्लकच असायची पण कुठेतरी केलेल्या कष्टाचा राहून गेलेला मेहनताना अस त्याच स्वरुप असायच.  माझे वडील उत्तम ज्योतिषी होते - पण पैसे घेत नसत.  मात्र आम्ही बिहार मध्ये होतो.  तिथे पध्दत अशी होती कि ज्योतिषाला काही तरी द्यावे.  तसेच बिहार मध्ये शेती उत्पन्नाची सुबत्ता फार.  म्हणून मग वडिलांकडे कधी भाज्या, कधी फळ, कधी मिठाई अशी आणली जायची.  असाच काहीसा लाभ माझ्या वाढदिवशी झाला, तर तो माझ्या नांवाने जमा होई.
       त्यामुळे जन्मापासून मी आजोबांची अतिशय लाडकी होते.  माझ्यावर कधीही हात उगारायचा नाही अशी घरांतील सर्वांना आजोबांची सक्त ताकीद होती.  माझ्या सगळयाच  सख्ख्या - चुलत - आते भावंडांनी लहानपणी कधी ना कधी मार खाल्लेला आहे.  पण मी मात्र थाटात असायची.
       आजोबा पंचक्रोशीत हुषार आणि हरिभक्त म्हणून गाजलेले होते.  सन्‌ एकोणवीसशे दहा मध्ये त्या काळात प्रतिष्ठेची मानली जाणारी व्हर्न्यक्युलर फायनल (सातवी) परिक्षा पास होऊन आपल्याच शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून लागले. पण त्यांच्या वडिलांनी सांगितले की नोकरी तुझ्या एकट्यापुरती राहील, त्याऐवजी संपूर्ण कुटुंबासाठी असेल असे काहीतरी कर. म्हणून त्यांनी नोकरी सोडून देऊन गांवातली पहिली लाकडाची वखार टाकली आणि दुकानावर बसू लागले ते एकोणवीसशे पंचावन्न पर्यंत.


       त्या काळांत धरणगांव हे प्रत्यक्ष तालुक्याचे ठिकांण नसले तरी गांवाचा रुबाब इतर तालुका शहरांसारखाच होता.  धरणगांव ही एक मोठी बाजारपेठ होती.  त्या काळांत गांवात सिमेंटचे रस्ते होते.  गांवात विणकर समाज फार मोठा होता. तिथे हातमागावर तलम लुगडी, धोतर आणि सतरंज्या विणल्या जात.  धरणगांव, धुळे, सूरत अशा तीन मोठया बाजारपेठ त्यांना मिळत.  त्यामुळे आजोबांची वखार पण उत्तम चालली - शेजारी अजून कांही वखारी उभ्या राहिल्या.  वखारीच्या खरेदीसाठी आजोबा पार कलकत्त्या पर्यंत जात.  हे सर्व क्षेत्र गांवठाणाच्या थोड बाहेर, रेल्वे स्टेशनाच्या जवळ होते.  निधून थोड पलीकडे चिंतामण मोरयाचे मंदिर होते.  उत्तम पाषाण व फरश्यांनी बांधून काढलेल्या या मंदिरातील गणेश मूर्ति - स्वयंभू आहे.  या मंदिरात प्रत्येकाच्या मनातली - इच्छा पूर्ण होते असे मानतात.  आजोबांच्याही शंभर - दिडशे वर्ष मागे त्या मूर्तीचा जीर्णोद्वार करण्यांत आल्याचा संगमरवरी दगडावर कोरलेला आलेख आहे.  लहानपणी आजोबा मला इथे होऊन यायचे.  पाढे, स्तोत्र आणि गणित शिकवायचे, अस अंधुक अंधुक आठवत.  आजी खूप खूप पूर्वीच वारली. घरांत आजोबा, आई, आजोबांच्या धाकटया भावाचा मोठा गोतावळा व शिकण्यासाठी येऊन राहिलेली इतर नातेवाईक भावंड. त्या सर्वांना अभिमानाने माझ्या गणितातील प्रगति बद्दल आजोबा बोलून दाखवीत.
       मी सात वर्षाची असतांना वडिलांना मध्य प्रदेशात जबलपूर येथे कॉलेज मध्ये लेक्चररची नोकरी मिळाली.  तेव्हा आजोबांनी वाटे हिस्से केले.  वखार आपल्या धाकटया भावाकडे सुपूर्द केली आणी आम्ही जबलपूरला आलो.
       मला शाळेचा पहिला दिवस आठवतो.  मला सरळ तिसरी इयत्तेत घेतले होते.  तेव्हा तोंडी गणितांची परंपरा होती.  आजोबा तर उठ - सूठ तोंडी गणित विचारत आणि गणित सोडवण्याच्या नाना युक्त्या पण सांगत.  त्यांना लगेच उत्तर सांगून मी मोकळी होत असे.  पण शाळेत तस नव्हत.  पाटी वर उत्तरे लिहायची होती.  दहा तोंडी गणितांची दहा उत्तर.  त्यांत माझा उत्तरे लिहिण्याचा क्रम उलट सुलट झाला आणि माझी तीन उत्तर चुकली.  पन्नास पैकी फक्त पस्तीस मार्क.  मला रडू कोसळल. तेवढयांत मास्तर विचारू लागले -- सगळयांत जास्त मार्क पस्तीस - ते कोणी मिळवले ? कोण ही नविन मुलगी ? घरी आजोबांना हा किस्सा सांगितला.  तेव्हापासून ते पाटीवर उत्तरे लिहायची - सवय करुन घेऊ लागले.
       पुढे दोन वर्षांनी आजोबा वारले आणि आम्ही पण जबलपूर मध्य प्रदेश सोडून लांब दरभंगा, बिहार येथे गेलो.  मात्र दर वर्षी उन्हाळ्याच्या सुटीत धरणगांवला येत राहिलो.  आजोबा साळी समाजाच्या सभागृहामध्ये भजन व कीर्तन करीत असत.  तिथेच वडिल महिनाभर दररोज सकाळी ज्ञानेश्वरी वर प्रवचन करू लागले. वडिलांचा  हा क्रम अव्याहतपणे सुमारे चाळीस वर्ष चालला.
       सुटीत धरणगांवला आल्यावर दररोज चिंतामण मोरयाच्या दर्शनाला जावे हा जणू नियमच ठरून गेला.  तसे गावात इतर बऱ्याच मंदिरात फेरफटका मारला जाई. पण गावकुसाबाहेर शेत आणि बाभळीच्या बनातून गेलेल्या पायवाटेने चिंतामण मोरयाला जाण्याची ओढ वेगळीच होती.  तिथे वेळ असेल त्या प्रमाणे प्रदक्षिणा व अथर्वशीर्षाचा पाठ आम्ही करीत होतो.  कधी फक्त एक तर कधी  एकदम एकवीस पर्यंत.  तिथे जाऊन मला नेहमी वाटे - याला कांय मागायच ? याला सगळी माहित आहेच.  पण इतर जण सांगत - अस नाही म्हणू - या मूर्तीपुढे आपले मन बोलून दाखवले - तर हवे ते मिळते.  आजही आमच्या घरांत काही अडले नडले तर पटकन्‌ मोरया, तुला नारळ फोडीन अस म्हटल जात.

      दर वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत धरणगांवला येणाच्या कार्यक्रमामुळे तिथले रस्ते असे तोंडपाठ की डोळे मिटून किंवा अंधारात चालेले तरी हरकत नाही.  आज इतकी वर्ष झाली पण ते सिमेंटचे रस्ते, धाब्याची घरे, दुकान, पिठाच्या गिरण्या, कोट (बाजाराची भली मोठी बांधीव जागा), मंदिर, शाळा, बरीचशी झाडे पण तश्शीच आहेत.  मात्र चिंतामण मोरयाचा परिसर बदलला.  गेल्या दहा वर्षात मंदिराच्या आसपास इतर बरीच मंदिर काढली आणि त्या छोटया परिसराला खेटून खूप घरं आणी खूप लोकवस्ती झाली.
       आता माझ धरणगावी किंवा मोरयाला फारस जाण होत नाही.  पण कुणीतरी धरणगांवचा वारसा सांगणारा संगणक शिकला आणि त्याने चक्क चिंतामण मोरया डॉट कॉम अशी साइट बनवून टाकली.  ज्यांनी मोरयाची प्रचीति घेतली आहे असे शेकडो लोक त्याला दुवा देत आपल्या संगणकावर मोरयाचे दर्शन घेत असणार यात मला शंकाच नाही. 
--------------------------------


                                 
 
       
































































कोई टिप्पणी नहीं: