बायो डाटा
धरणगांव, जिल्हा
जळगाव येथे १९५० मधे जन्म. बिहार मधे M.Sc. Physics पर्यंत शिक्षण व
लेक्चररशिप. १९७४ ला IAS मधे प्रवेश. खानदेशातील पहिली महिला अधिकारी म्हणून
मधुकरराव चौधरींनी खास तार पाठवून अभिनंदन केले. पुणे, औरंगाबाद, मुंबई, सांगली,
नाशिक दिल्ली येथे विविध सरकारी पदांवर काम केले कलेक्टर, सीईओ, कमिशनर, उद्योग
महामंडळ, राष्ट्रीय महिला आयोग, केंद्र शासनात पेट्रोलियम कंझर्वेशन रिसर्च
असोसिएशनची डायरेक्टर वगैरे कामे सांभाळली. महाराष्ट्रातून अतिरिक्त मुख्य सचिव या पदावुून निवृत्तिनंतर Member CAT व CIC, Goa ही पदे भूषविली. सांगली कलेक्टर असतांना केलेले देवदासी पुनर्वसनाचे काम बरेच नावाजले गेले.
उत्तम लेखक व वक्त्या म्हणून प्रसिद्ध. मराठी, हिंदी व
इंग्रजीतून लिखाण. विषय बहुतेक प्रशासनिक व सामाजिक. सोबत बाल वाङमय, विज्ञान
लेखन, निसर्ग निरीक्षण, आणि इतर
भाषांमधून मराठी व हिंदीत अनुवाद केले आहेत.
पुस्तके --- १) ये ये पावसा - बाल कथा संग्रह, २) सोनं देणारे पक्षी -- निसर्ग निरीक्षण, ३) नित्य लीला - मराठीत अनुवाद - कथासंग्रह ४) लोकशाही -- इंग्रजीतून अनुवाद ५) आनंदलोक -- कुसुमाग्रजांच्या शंभराहून अधिक कवितांचा हिंदी अनुवाद. हिंदीत इतर पाच पुस्तके. अणु विज्ञानावर दीर्घ लेखमाला आकाशवाणी सांगलीवरून प्रसारित.
लीना मेहेंदळे यांच्या लेखाला पुरवणी पान २
------------------------------------------------------------
भारतीय सेवांच्या बाबतीत थोडे दाखले देऊन बोलायचे म्हटले तर
या सेवांमधे ज्यांनी ठळकपणे उठून दिसणारी कामे केली अशी कित्येक उदाहरणे देता
येतील. मुंबईत झोपडपट्टीत रहाणार्याचे प्रश्न हाताळणारे व नंतर मुंबई
महानगरपालिकेचे आयुक्त झालेले तिनईकरांचे उदाहरण घ्या. आजही झोपडपट्टीवासियांच्या
प्रश्नांची जाण जेवढी त्यांना आहे तेवढी कुणालाच नसेल. मुंबई महानगरपालिकेचेच
आयुक्त असलेल्या शरद काळे यांनी नगरपालिकेच्या शाळांची शैक्षणिक गणवत्ता
सुधारण्याचा कार्यक्रम हाती घेतल्यावर आयसीआयसीआय बँकेपासून सर्वांनी त्या मधे
सहभाग घेतला. पंजाब मधे अतिरेक्यांचा प्रश्न उसळला तेंव्हा कडक शिस्तीचा, कणखर पण
तिथल्या लोकल पाँलिटिक्सच्या दृष्टीने त्रयस्थ अधिकार्याची गरज भासली तेंव्हा
रिबेरो यांचीच निवड झाली. आजही सिंधुदुर्ग जिल्ह्यांत प्रोढ शिक्षणाच्या कामासाठी
संजीवनी कुट्टी, पंढरपुरच्या वारीमधे शिस्तबद्ध व्यवस्था निर्माण करण्यासाठी
रमानाथ झा, ठाणे व नागपूर शहरांतील रस्ते सुधारण्यासाठी चंद्रशेखर, महिला
धोरणासाठी चंद्रा अय्यंगार या सारख्या IAS अधिकार्यांची आठवण काढली जाते. वन अधिकारी म्हणून नोकरीत लागलेले मारुती
चित्तमपल्ली उत्तम निसर्ग निरीक्षण व लिखाणासाठी प्रसिद्ध झाले ते नोकरीतील
अनुभवांमुळेच. चांगल्या पोलिस प्रशासनासाठी सतीश साहनी, अरविंद ईनामदार, अनामी
राय, मीरा बोरवणकर, सुरेश खोपडे यांची नांवे फक्त लोकच घेतात असे नाही तर त्यांचे
संपूर्ण खातेच त्यांच्या चांगल्या कामाकडे आशेने डोळे लावून बसलेले असतात. मीरा
बोरवणकर यांनी ओरंगाबाद व सातारा येथे DSP म्हणून जी उत्तम कामगिरी बजावली, किंवा
जळगांव सेक्स स्कँडलचा पाठपुरावा ज्या हिरिरीने केला, त्यामुळेच आज त्यांचे मुंबईत
पोस्टिंग झाल्याझाल्या जवळ जवळ प्रत्येक वर्तमानपत्राने त्यांचे स्वागत केले आहे.
उत्कृष्ट कामाबाबत एवढी व्यापक पावती इतर कुठल्याही नोकरीत मिळू शकत नाही.
माझा स्वतचा अनुभव हेच सांगतो की चांगले प्रशासन पुरवण्याची
कळकळ असलेले अधिकारी लोकांना दीर्घकाळ लक्षांत रहातात. याबाबत नुकताच झालेला एक
संवाद आठवतो. तीन चार महिन्यांपूर्वी मी तेलगी प्रकरणाबद्दल लेख लिहिला होता.
त्यांत तेलगी सारख्या प्रकरणी लौकर व पुरेशी शिक्षा न झाल्यास सचोटीने काम करणार्या
अधिकार्यांचे कसे खच्चीकरण होत जाते इत्यादि लिहिले होते. लेख जरा परखडच होता. तो
वाचून मुंबईहून एका व्यक्तीने मला फोन केला. मी सांगलीला कलेक्टर असताना नियमबाह्य
किंवा बेजबाबदार वागणार्या दारुच्या दुकानांबाबत कसे कडक धोरण ठेवले होते,
धनदांडग्यांना न जुमानता त्यांचे परवाने रद्द केले होते, प्रत्यक्ष गावात जाऊन मी
पहाणी करीत असे आणि अंमलबजावणीबद्दल काटेकोर होते वगैरे गोष्टी त्या वेळी आठवी
नववीत असलेला त्या गावातला एक विद्यार्थी पहात होता व त्या बद्दल त्याच्या मनात
आदर निर्माण होत होता. एवढी वर्ष या घटना त्याने
लक्षांत ठेवल्या होत्या. आता माझा पत्ता माहित करून घेऊन मला फोन करीत
होता. त्या गावांतील घटनेच्या दिवशीच त्यांच्या शिक्षकाच्या घरी जन्मलेल्या नवजात
मुलीचे नाव त्याने व त्याच्या मित्रांनी आग्रहाने लीना असे ठेवायला लावले होते.
फोन वर हे सर्व ऐकत असताना मी अक्षरश अवाक् झाले होते. भारतीय प्रशासनिक सेवेत
येऊन योग्य प्रकारे काम केले तर त्याची पावती कुठल्या कुठल्या कान्या कोपर्यातून
मिळत राहील तो अंदाज करणे अशक्यच. आसाम मेघालयच्या चीफ सेक्रेटरी असलेल्या प्रतिभा
त्रिवेदी यांनी मला त्यांच्या आठवणीतला एक किस्सा सांगितला. त्या कधी एकदा खांडवा
येथे असिस्टंट कलेक्टर असताना एका दुष्काळी गावात त्यांनी आपले सर्व अधिकार पणाला
लावून दुष्काळी विहिरींचे काम करून घेतले होते. आता त्या रिटायर झाल्या आहेत. पण
त्या गावातील शेतातला मेवा अजूनही त्यांच्याकडे आदराने नेऊन दिला जातो. कामाचे
समाधान, चांगले काम करण्याची संधी, आणि त्या
कामासाठी लोकांनी दिलेली पावती जेवढी या नोकरीत आहे तेवढी
इतरत्र कुठेही नाही. म्हणूनच ज्यांना देशासाठी, समाजासाठी व लोकांसाठी काही करायचे
आहे त्यांच्यासाठी निश्चितच हे अतिशय उत्तम करियर आहे.
---------------------------------------------------------------
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें