मराठीसाठी वेळ काढा

मराठीसाठी वेळ काढा

मराठीत टंकनासाठी इन्स्क्रिप्ट की-बोर्ड शिका -- तो शाळेतल्या पहिलीच्या पहिल्या धड्याइतकाच (म्हणजे अआइई, कखगघचछजझ....या पद्धतीचा ) सोपा आहे. मग तुमच्या घरी कामाला येणारे, शाळेत आठवीच्या पुढे न जाउ शकलेले सर्व, इंग्लिशशिवायच तुमच्याकडून पाच मिनिटांत संगणक-टंकन शिकतील. त्यांचे आशिर्वाद मिळवा.

शनिवार, 19 अक्तूबर 2013

प्लेगची भिती किती निरर्थक - दै.मटा ६-१०-९४

प्लेगची भिती किती निरर्थक - दै.मटा ६-१०-९४


प्लेग : सार्थ भीती की पळपुटेपणा ?
लीना मेहेंदळे -- महसूल आयुक्त नाशिक
महाराष्ट्र टाइम्स
६.१०.९४ (४९)

   गेला आठवडाभर अक्षरशः जळी स्थळी लोकांना एकच गोष्ट दिसते आहेती म्हणजे प्लेग ! भित्यापाठी ब्रह्मराक्षस लागावा - त्याने पळावे, पळावे, मग दमून थांबावे आणि सहजच मागे वळून पाहावे, तो त्याच्याच पावलांचा आवाज ! पण आपण इतक्या क्षुद्र गोष्टीला घाबरून आपण पळालो होतो, हे त्याला तेव्हा जरी कळले, अशा पुढल्या प्रसंगी पळपुटेपणा दाखविण्याची बुद्धी त्याला स्फुरली तरी मी म्हणेन पुष्कळमात्र प्लेगच्या बाबतीत आजही तसे झालेले नाही !
   खरे सांगायचे तर पहिल्या दिवशी माझ्याही मनात भीती दाटली होती - पण वेगळ्या कारणाने. ती कधीच संपली. मग इतरांची अजून का संपलेली नाही ?
   २२ सप्टेंबरला  दुपारी मी सरकारी कामानिमित्त बडोदा येथे पोचले. सोबत महाराष्ट्र सरकारचे अतिरिक्त आरोग्य संचालक होते. आम्ही शहरांत एक फेरफटका मारला, तर ८-१०  दिवसांपूर्वी येऊन गेलेल्या महापुराच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. बेसमेंटमधील दुकानांचे मालाचे अतोनात  झाले होते. गल्ली, रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पडले होते. गुजरातेतल्या सगळ्याच शहरांमध्ये ही अवस्था झाली असावी. कित्येकदा पाण्याबरोबर प्रेते वाहून येत, शहरात ती कोठे तरी अडकून राहात ! पुढे पाणी ओसरायचे पण प्रेते तशीच राहायची. दुर्गंधी असे, पण प्रेतही लगेच उचलणे शक्य होत नसे. त्यातच उंदीर, घुशींच्या बिळातून पाणी जाऊन त्यांना बाहेर पडावे लागले असणार. जे बडोद्यात घडले, तेच दृश्य सुरतमध्ये असणारच.

२३ ला सकाळी सर्वच गुजराती पेपर सुरतेतल्या प्लेगच्या बातम्यांनी भरलेले होते. कोणी म्हणे १४ मेले, कोणी चाळीस तर कोणी चारशे !  'हा प्लेग नाहीच' अशा धोशा पण लावला गेलाचमला नव्वदएक वर्षांपूर्वीच्या प्लेगची भयानक वर्णने वाचली होती, ती आठवू लागली - त्यावेळी प्लेग रोखण्यासाठीसगळीकडेच, पण विशेषतः पुण्यात इंग्रज सरकार कशा अमानुषतेने वागले, ती वर्णने आठवू लागली. आजही प्लेगची संहारकता जर तेवढीच तीव्र असेल, तर सरकार पुनः तशाच पद्धतीचे उपाय  करणार का ? आणि त्यांत जबाबदार सरकारी अधिकारी म्हणून माझी भूमिका काय असेल ? प्लेगपेक्षा जास्त भीती याचीच होती. 
   पण डॉ वानेरे यांच्याबरोबर चर्चा केल्यावर मला एकदम निश्चिंत वाटू लागले. याचे कारण टेट्रासायक्लिन. पूर्वी या देशात प्लेगच्या साथी येऊन गेल्या तेव्हा अँण्टीबायोटिकचा शोध लागला नव्हता. आता टेट्रासायक्लिनमुळे प्लेगवर हमखास इलाज होऊ शकतो. याचे ज्ञान आज झाले आहे. मग काय काम सोपे आहे। ज्याला प्लेग होईल त्याला एक टेट्रासायक्लिनचा कोर्स देऊन टाकायचा. किती सोपे काम। आणि हो, त्याला शक्यतो इतरांपासून वेगळे ठेवा. बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे. म्हणजे ८-१० दिवस ताप असेल. तेवढे दिवस धैर्य बाळगा. क्वचित प्रसंगी एखाद्याला टेट्रासायक्लिन चालत नसेल, उदाहरणार्थ लहान मुले, गरोदर स्त्रिया किंवा आणखी कुणी, तर इतर औषधे आहेत. साइड इफेक्ट्स टाळण्यासाठी व्हिटमिनच्या गोळ्या द्या - इत्यादी ! बस ! सुरतेतल्या लोकांना एवढे सांगायचे आणि कचरा साफ करायचा ! अजून काय लागते प्लेग रोखायला ? एवढी चर्चा करून आम्ही आमच्या दूरस्थ गांवभेटीच्या कामावर निघालो.
  
पण संध्याकाळी दौऱ्याहून परत येईपर्यत चित्र बदलले होते. धुळ्याचे जिल्हाधिकारी आमच्याबरोबर होते. त्यांच्यासाठी निरोप होता - सुरतेहून लोक मोठया संख्येने धुळ्यात येत आहेत - त्यांचे काय करायचे ? त्यांनी माझ्याकडे पाहिले. आमचे ठरले - सीमा रोखायच्या नाहीत - कारण प्लेग हा काही जीवघेणा रोग राहिलेला नाही. ज्या सुरतवासीयांना ही गोष्ट नीट समजून सांगितली गेली नसेल, तेच पळत असतील.  ते आजारी नाहीत. मात्र रोगजंतूंचे वाहक असू शकतात. म्हणून त्यांच्यावर थोड़ी  देखरेख ठेवावी लागेल. अशाही बातमी आली की सुरत, बडोदा, अहमदाबाद येथे बाजारातून टेट्रासायक्लिन गोळ्या लुप्त झाल्या आहेत. अशावेळी, ज्या शहरात औषध मिळणे  शक्य असेल, तेथे लोकांनी धाव घेणे साहाजिक होते, त्यांना अडविणे चुकीचे ठरले असते. पण तपासणीची काळजी घेण्याबाबत सूचना आम्ही दिल्या.
शनिवारी मुंबईत परतल्यानंतर माझ्या विभागातील तीनही जिल्हाधिका-यांशी चर्चा केली. जळगावच्या जिल्हा-धिका-यांनी भुसावळ-सूरत मार्गावरील प्रत्येक रेल्वे स्थानकात, गुजरातहून येणा-या प्रवाशांची वैद्यकीय तपासणी सुरु केली होती. धुळ्याच्या जिल्हाधिका-यांनीही बस आणि रेल्वे स्थानकावर अशीच व्यवस्था केली होती. त्याशिवाय, धुळयातील शाळा, महाविद्यालये चित्रपटगृहे बंद करण्याचे आदेश दिले होते. नाशिकमध्ये जिल्हाधिका-यांनी चार वैद्यकीय पथके बनवून पेठ आणि सुरगणा या तालुक्यांत चार तपासणी केंद्रे उधडली होती
   पुढच्या चार दिवसांत सर्वत्र बीएचसी किंवा डीडीटीची फवारणी करण्यात आली. टेट्रासायक्लिन मोठया प्रमाणावर उपलब्ध व्हावे याचीही काळजी घेण्यात आली. तिन्ही जिल्हाधिका-यांनी वृत्तपत्रे आकाशवाणीच्या माध्यमातून सरकारच्या उपाययोजनांची माहिती लोकांना करुन दिली. औषधांचा उपलब्ध साठा, गुजरातमधून आलेल्या स्थलांतरितांची संख्या, त्यांच्या तपासणीची आकडेवारी, अशी सर्व माहिती लोकापर्यंत पोहोचविली गेली. २४ ते ३० सप्टेंबर या काळात सुरतहून सुमारे ६० हजार लोक या तीन जिल्हायांत आले होते. यापैकी ५०० जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले. या सर्वांच्या रक्ताची तपासणी करण्यात आली. त्याना टेट्रासायक्लिन देण्यात आले. यापैकी, ५० पेक्षाही कमी लोकांत प्लेगचे जंतू सापडले. त्यामुळे एकही मृत्यू ओढवला नाही.
वरील आकडे आपल्याला काय सांगतात ? हेच की प्लेगची लागण  होण्याचे प्रमाण फारच कमी होते. लाखभर लोकसंख्येचे एखादे साधे शहर पाहिले, तरी त्यांत रोज ५०-१०० लोक दवाखान्यात जातातच. मग प्लेगलाच एवढे घाबरण्याचे कारण काय?
   पण जिल्हा प्रशासनला खरी भीती असते ती ही की, लोकांनी अज्ञान किंवा गैरसमजुतीतून आपला आजार लपवायचा प्रयत्न करु नये. ज्यांच्या डोक्यात प्लेगचे जुने चित्र अजून पुसले गेले नसेल, प्लेग बरा होऊ शकतो, साध्या सोप्या तऱ्हेने बरा होऊ शकतो हे ज्यांना समजले नसेल, ज्यांनी आपली रोगप्रतिकारकक्षमता आजमावलेली नसेल, तेच याला घाबरतात आजार लपवायचा प्रयत्न करतात. ही पळपुटी मनोवृती पहिल्यापासूनच अडवता आली असती.
मोकळी चर्चा
   एक छोटी घटना नमूद करण्यासारखी आहे. नाशिक इंजिनीयरिंग कॉलेजच्या वसतिगृहात दिल्ली, उत्तर प्रदेशकडचे खूप विद्यार्थी आहेत. धुळ्यात शाळा - कॉलेजेस १० दिवस बंद केली म्हटल्यावर यांचे पालक थोडे घाबरले. 'सुटया द्या'
अशा मागणी आली. धुळे शहरांत सुरतहून सात-आठ हजार लोक आले, तर नाशकांत त्या मानाने फार कमी. त्यामुळे नाशिकमध्ये सुटीची गरज नाही, असा निर्णय जिल्हाधिका-यांनी घेतला. मात्र महाविद्याल्यांत वैद्यकीय पथक गेले, तपासणी झाली, विद्यार्थ्यांबरोबर मोकळी चर्चा झाली. व त्यांनी घाबरू मये हे पटवून दिले गेले. एवढेच नाही तर नाशिक जिल्ह्यांतील नवरात्रीच्या पारंपरिक जत्रा सुद्धा थांबवावयाच्या नाहीत, पण वैद्यकीय सावधगिरी मात्र नीट बाळगायची, असा निर्णय घेण्यात आला.
   माझ्या, अठरा वर्षांच्या मुलाने मला विचारले - तू प्रवासाला गेल्यावर घरांत कुणाला ताप आला तर काय करायचे? मला वाटते ही चर्चा घराघरांतून व्हायला पाहिजे. मी म्हटले- आधी नेट्रम मूर किंवा तुळशीची पाने खायची. दुस-या दिवशी डॉक्टरांना विचारुन टेट्रासायक्लिन - आधी नाही. आजार होऊच नये अशी काळजी घ्यायची असेल, तरीसुद्धा नेट्रम मूर किंवा तुळशीची पाने खायची. तेच प्रतिबंधकही आहेत. याबद्दलसुद्धा थोडे सांगता येईल. खूप वर्षापूर्वी बायोकेमिकल (बाराक्षार) औषधांची माहिती देणारे, मित्रा नामक लेखकाचे एक जाडजूड पुस्तक मी वाचले. त्यात नेट्रम मूरबद्दल म्हटले होते की, यामुळे शरीरीतले बॉडी फ्लूइड्स जास्त प्रमाणात शरीराबाहेर निघून जातात. म्हणून बैक्टिरीयल, व्हायरल किंवा पॅरासाइट्सचे इन्फेक्शन असेल, तर ते जिवाणू एरवी बॉडी फ्लूइड्सवर पोसले जात असल्याने, ते पण बाहेर टाकले जातात. हे नेट्रम मूर मी इतर काही इन्फेक्शन्समध्ये आजमावलेले आहे आणि आता तर प्लेग हा काही जीवघेणा आजार राहिलेला नाही. मग एकदम टेट्रासायक्लिनवर जाण्यापेक्षा एखाद दिवस नेट्रम मूर वापरुन पाहायला काय हरकत आहे? मात्र हा विचार उपचार सध्या तरी फक्त माझ्यापुरताच मी मर्यादित ठेवते. असो.

मात्र, या सर्व घटनाक्रमातून दोन - तीन बाबी प्रकर्षाने जाणवल्या. लोकांत घबराट का पसरते, तर सुरुवातीपासून त्यांना नीट माहिती देण्याची यंत्रणाच काहीशी कमकुवत राहते म्हणून. माहिती देण्याची भाषा ही ब-याच वेळी अविश्वास निर्माण करणारी असते.
उदाहरणार्थ, आधी सांगितले गेले की, हा प्लेग नाही. प्लेगसदृश रोग आहे, पण प्लेग नाही. आता, हेच सारखे घोळत राहून लोकांचे काय समाधान होणार ? प्लेग असो किंवा प्लेगसदृश, त्याने जीव जाणार असेल तर ते नेमके काय आहे, याच्याशी लोकांना फारसे कर्तव्य उरतच नाही. ते घाबरणारच. पण आता चित्र पालटले आहे, आता त्यावर परिणामकारक औषधे उपलब्ध आहेत, सर्वांना उपचार मिळतील यासाठी आरोग्य यंत्रणा आहे, फवारणीची औषधे आहेत आणि महत्वाचे म्हणजे हे सर्व करण्यास प्रशासन सज्ज आहे, हे त्यांच्यापर्यंत सांगितले गेले पाहिजे.

   दुसरी गोष्ट आयुर्वेद किंवा इतर इलाज पद्धतींची. आयुर्वेदाच्या काही तज्ज्ञांचे सल्ले वाचले. कुणी तुळस, बेल, पिंपळ, कुणी कडुलिंब, कुणी शेण इत्यादी सांगितले. हे सर्व आपल्या देशात खूप वर्षांपासून रोगप्रतिबंधक मानले जातात. पूर्वी पारतंत्र्यामुळे यांच्याबाबत संशोधन किंवा प्रयोग झाले नव्हते. ते प्लेगच्या साथीची संधी पाहून करता आले असते.
थोडक्यात ही संधी सरकारी संशोधन संस्थांनी घालवली. आता कुणी म्हणेल की, यात संशोधन कशासाठी हे उपाय फार काळापासून सिद्ध झालेले आहेत. असतील - पण साथ आल्यावर त्यांची उपयोगिता वाढवण्यासाठी नेमके कशा प्रकारचे आयोजन हवे, डोसेस काय असतील - हा संशोधनाचा भाग असून तो अजूनही अनुत्तरित किंवा चाचणी झालेला आहे. त्या चाचण्या या निमित्ताने करता आल्या असत्या. ती संधी आपण गमावली कारण त्यासाठी लागणारी पूर्वसज्जता ठेवायला आपण अजून शिकलेलो नाही. 
    पण एका बाबीमुळे मात्र खरोखरच राईचा पर्वत बनविला गेला आहे. सर्वसामान्यांचे अज्ञान आणि आपल्या शहरांची अस्वच्छता. तसे पाहिल्यास अगदीच क्षुल्लक गोष्टी. पण या दोन्ही संदर्भात आमच्या शहरांमधील प्रशासकीय व्यवस्था काहीशी अपयशी ठरली. सुरतमध्ये अस्वच्छता होती म्हणून रोगाची लागण झाली. त्यावरील उपचार माहिती नसल्याने लोक घाबरले पळाले. मुंबईत, दिल्लीत आले. धुळयात, नाशिकमध्येही आले. आता, या शहरांत आधीच स्वच्छता आस्तित्व असतीतर घाबरण्याचे कारणच नव्हते. पण येथेही अस्वच्छताच असल्याने लोक अधिक घाबरले. ही भीती, तिची चर्चा मोठया प्रमाणातच वाढली. बहूतेक आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक कंपन्यांनी भारतातली उड्डाणे स्थगित केली. सुरतमधल्या हिरे व्यापाराचे अतोनात नुकसान झाले. टेट्रासायक्लिन, बीएचसी यांवर प्रशासनाला मोठा खर्च करावा लागला, यापेक्षाही अधिक नुकसान झाले, ते परदेशी निर्यात थंडावल्याने. ती  पूर्वपदावर यायला बराच काळ जावा लागेल.
   सर्वसाधारण स्वच्छतेच्या बाबतीतली आमची उदासीनता आणि निष्क्रियता हा आता जीवनाचा एक भागच बनला आहे. त्यामुळेच, आमच्या शहरातल्या, भोवतालच्या अस्वच्छतेबाबत आमचे डोळे बंद असतात. या निष्क्रीयतेनेच सर्वांत मोठे नुकसान केले आहे.
-------------------------------------------